मायणी : कलेढोण, ता. खटाव येथे पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत झालेल्या कामाला वरुणराजाने साथ दिली असून, मागील सात ते आठ दिवसांमध्ये झालेल्या रिमझिम पावसामुळे हजारो लिटर पाणी साठले आहे. या पाण्यामुळे जुन्या विहिरींना पाझर फुटल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.पाणी फाउंडेशन कार्यक्रमांतर्गत कलेढोण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे मार्गी लागली आहेत. लोकांनीही दुष्काळग्रस्त हा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र श्रमदान केले. कलेढोण परिसरामधील डोंगरमाथ्यावर सुमारे दीड लाख घनमीटर पाणीसाठा होईल एवढे प्रचंड काम ग्रामस्थांनी केले. केलेल्या कामामध्ये पावसाचे पाणी साठेल, या आशेने ग्रामस्थ व युवावर्ग आभाळाकडे डोळे लावून बसले होते.प्रतिवर्षी प्रमाणे पाऊस हुलकावणी देतोय काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मागील सात ते आठ दिवसांपासून कलेढोण परिसरामध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. अधूनमधूून हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी परिसरामध्ये पडत आहेत. या पडणाऱ्या पावसामुळे हळूहळू या पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये पाणीसाठा होऊ लागला आहे.डोंगर उतारावर पडणाºया पावसाचे पाणी पाझर तलावात, मातीबांध व नालाबांधमध्ये हजारो लिटर पाणी जमा झाले आहे, हे जमा झालेले पाणी हळूहळू जमिनीत मुरू लागले आहे. त्यामुळे परिसरामध्ये असलेल्या जुन्या विहिरी, नैसर्गिक नाले यांना पाण्याचे पाझर फुटण्यास सुरुवात झाली आहे.पाणी फाउंडेशन अंतर्गत केलेल्या ४५ दिवसांच्या कामामध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी परिसरामधील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या पावसाच्या व हक्काच्या पाणी प्रतीक्षेत आहेत.
कलेढोणच्या श्रमदानाला वरुणराजाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:05 PM