वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपविण्याचा विडाच उचलला, पृथ्वीराज पाटील यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 06:04 PM2024-11-30T18:04:26+5:302024-11-30T18:05:21+5:30
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतली. त्यांच्या घरातील व्यक्ती ...
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतली. त्यांच्या घरातील व्यक्ती लढत असली, तरी त्यांनी तटस्थ रहायला हवे होते. त्यांनी बंडखोरांचा उघड प्रचार केला. लोकसभेला त्यांना सर्वांनी केलेल्या मदतीची जाणीव त्यांनी ठेवली नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.
ते म्हणाले, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा, वसंतदादांचा बालेकिल्ला होता. वसंतदादांच्या वारसांनी तो उद्ध्वस्त करायला हातभार लावला. त्यांच्या घरातील एका महिलेने बंडखोरी केली. अपक्ष खासदारांनी माझ्या विरोधात उघड भूमिका घेतली. प्रचार शुभारंभ, सांगता सभेला जाहीरपणे ते व्यासपीठावर गेले. भाषणे केली. त्यांचे सगळे माजी नगरसेवक, पदाधिकारी उघडपणे प्रचार करत होते. माजी मंत्री प्रतीक पाटील बॅक ऑफिस सांभाळत होते. पत्रकार परिषदा घेत होते. भाजपच्या विरोधात न बोलता माझ्याविरोधात बोलत होते. वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपविण्याचा विडाच उचलला, हे दुर्दैवी आहे. आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत आहोत. वीस वर्षांनंतर सांगलीत काँग्रेस जिंकण्याची स्थिती होती, वातावरण पोषक होते. मात्र, जे घडले ते सर्वांसमोर आहे. बंडखोरी रोखण्यात प्रदेश स्तरावरूनही अपयश आले.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना खासदार करण्यासाठी आमदार विश्वजीत कदम, विक्रमसिंह सावंत, मी आम्ही सर्वांनी मिळून ताकद लावली. त्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. भाजपने सांगलीत षङ्यंत्र रचले. काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्याचे पुरावेच आम्ही दिले. प्रदेश काँग्रेस नेत्यांसमोर ही सगळी वस्तुस्थिती मांडली आहे. जयश्रीताई पाटील यांनी निवडणूक लढवून काय साध्य केले. डिपाॅझिट जप्त झाले. निवडणूक लढविली नसती, तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती.