सांगली : वसंतदादा बँकेत अडकलेल्या महापालिकेच्या ६८ कोटी रुपयांच्या ठेवी वसुलीवरून शुक्रवारी सभेत सत्ताधारी भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीत खडाजंगी झाली.
जनतेवर करवाढीचा बोजा लादण्यापेक्षा वसंतदादा बँकेत अडकलेले पैसे अधिकाऱ्यांच्या पगारांतून वसूल करा, अशी मागणी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केली. यावरून विरोधकांनीही, जनतेची दिशाभूल करू नका, असा टोला लगाविला. अखेर आयुक्तांनी, ठेवीबाबत संबंधित अधिकाऱ्यांची शासनपातळीवर चौकशी सुरू असून लवकरच भार-अधिकार निश्चित होईल, असे स्पष्टीकरण दिले.महापालिकेची विशेष महासभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपच्या नगरसेविका स्वाती शिंदे यांनी वसंतदादा बँकेतील ठेवींचा विषय काढून विरोधकांना फटकारले. जनतेवर कराचा बोजा लादण्यापेक्षा बँकेतील पैसे वसूल करा, या प्रकरणात अधिकारी, तत्कालीन स्थायी सदस्य, नगरसेवक जबाबदार आहेत, जे दोषी आहेत, त्यांच्या मालमत्तेवर टाच आणावी.यावर काँग्रेसचे संतोष पाटील म्हणाले, वसंतदादा बँकेतील ठेवींबाबत आकसाने चर्चा नको. ठेवी कशाच्या, कशा अडकल्या याचा खुलासा करावा. जनतेत दिशाभूल करून निव्वळ टीका नको. आनंदा देवमाने, अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी यांनीही मते मांडली. सूर्यवंशी यांनी, जिल्हा बँक, जिल्हा परिषदेने ठेवी काढल्या, मग महापालिकेने का खबरदारी घेतली नाही, असा सवाल केला.