सांगली : अवसायनातील वसंतदादा बँकेच्या मुख्यालयासह सहा इमारतींच्या लिलाल प्रक्रियेस राज्याचे सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी स्थगिती दिली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत बँकेच्या कर्जवसुलीसाठी राज्य बँकेकडून पाच सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, वसंतदादा बँकेचे अस्तित्व टिकले पाहिजे यासाठी आमची धडपड आहे. ज्या कर्जदारांनी गेल्या पंधरा वर्षापासून कर्ज भरण्यास प्रतिसाद दिला नाही त्यांच्याकडील कर्जाची वसुली व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच मुंबईत जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार आयुक्त सतिश सोनी, राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत वसंतदादा बँकेबाबत मी भूमिका मांडली. बँकेच्या कर्जदारांकडे सध्या व्याजासहीत ३६४ कोटी रुपये येणे आहेत, तर ठेवीदारांची देणी १५८ कोटी रुपयांची आहेत. कर्जदारांचे केवळ मुद्दल १५४ कोटी रुपयांचे आहे. विमा कंपनीची बहुतांश रक्कम अवसायकांनी दिली असून त्यांचे केवळ ७ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे कर्जवसुलीतून ठेवीदार व अन्य देणी भागविली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत इमारती विकण्याची आवश्यकता नाही.सांगलीतील मुख्यालयाच्या इमारतीची जागेसहीत किंमत २0 ते २५ कोटी रुपयांच्या घरात असताना अधिकाऱ्यांनी याची लिलावाची किंमत १0 कोटी ७२ लाख इतकी निश्चित केली. तितक्याच किंमतीला ती विकली आहे. अद्याप जागेच्या व्यवहाराच्या नोंदी पूर्ण झालेल्या नसल्यामुळे सर्वच इमारतींच्या लिलाव प्रक्रियेस स्थगिती द्यावी, अशी मागणी केली.
सहकार आयुक्तांनी तातडीने इमारतींच्या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. वसंतदादा बँकेच्या कर्जवसुलीसाठी राज्य सहकारी बँकेचे चार सक्षम अधिकारी देण्याबाबतची आमची विनंती राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी मान्य केली. कर्जवसुलीसाठी आम्हीसुद्धा मदत करायला तयार आहोत. दिवंगत नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कधीकाळी जिल्ह्याच्या अर्थकारणाला पोषक ठरलेली ही बँक टिकावी म्हणून आमची धडपड आहे.