सांगली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादित माल जास्त काळ सुरक्षित राहावा, यासाठी वसंतदादा कारखान्यामार्फत ‘प्री-कुलिंग’ यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. त्याचबरोबर निटिंग व पॅकिंगची यंत्रणा उभारण्याचा प्रयत्नही केला जाईल. आगामी सभेत त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सभा रविवारी ऑनलाईन पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुनील आवटी, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, तसेच कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
विशाल पाटील म्हणाले की, द्राक्ष, केळी, भाजीपाला यांसारखा नाशवंत माल सहा ते आठ महिने चांगला राहण्यासाठी प्री- कुलिंग सिस्टिम उभारण्याचा विचार आहे. या यंत्रणेमुळे नाशवंत माल एक्स्पोर्ट करून शेतकऱ्यांना मालाची जास्तीत जास्त किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. तसेच शेतीमाल विक्रीसाठी कारखान्यामार्फत यंत्रणा उभी करण्याचाही विचार आहे. शेतीमाल निर्यात करणाऱ्या काही संस्था गावोगावी तयार झाल्या आहेत, पण त्यांना मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याची संधी उपलब्ध हाेत नाही. कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून याची सोय केली जाईल. प्री-कुलिंगसह निटिंग व पॅकिंग यंत्रणा उभारण्याबाबत येत्या सभेत निर्णय घेतला जाईल.
ते म्हणाले, आगामी हंगामात १० लाखाहून अधिक गाळप अपेक्षित आहे. जास्त गाळप झाले तर जास्त भाडे उपलब्ध होईल. सभासदांना साखर त्यांच्या भागात उपलब्ध व्हावी, यासाठी दहा महिन्यांची साखर एकाचवेळी सोसायट्यांमधून दिली जाईल. त्यामुळे सभासदांचा वेळ वाचेल. आगामी वर्ष निवडणुकीचे असून मृत सभासदांच्या वारसांनी शेअर्स हस्तांतर करून घ्यावेत. सध्या नवीन शेअर्स विक्री थांबवली असली तरी, सध्या ज्यांच्याकडे शेअर्स आहेत, त्यांना आणखी शेअर्स दिले जातील. तसेच ठेवीच्या रकमेतून शेअर्स देण्याचा निर्णयही घेतला आहे. संचालक अमित पाटील यांनी आभार मानले.
चौकट-
एकरकमी एफआरपी आवश्यक, पण...
विशाल पाटील म्हणाले, शेतकरी म्हणून विचार केला, तर सध्याच्या अडचणी बघता एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. परंतु कारखाना म्हणून विचार करताना, तुकड्यात दिली, तर शेतकऱ्यांना गरजेच्यावेळी उपयोगी पडेल असे वाटते.
चौकट
कंपनीबद्दल दोघांची नाराजी
शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील म्हणाले, कारखाना सभासदांचा असून रूबाब मात्र सध्या भाडेकरूचा दिसून येतो. भाडेकरू असले तरी, सभासदांशी मालक असल्याप्रमाणे कंपनी वागते. सांगलीवाडीचे प्रभाकर पाटील यांनीही, जळीत ऊस घेताना ८०० रुपये कपात केली असल्याची तक्रार केली.