सांगली : कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला, तर बंडखोरी करून पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल, असा इशारा कॉँग्रेस नगरसेवकांनी शनिवारी सांगलीतील बैठकीत दिला. यासंदर्भातील अधिकृत निर्णय रविवारी होणाऱ्या वसंतदादा गटाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
वसंतदादा कारखान्यात शनिवारी सकाळी ही बैठक पार पडली. या बैठकीस महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वहिदा नायकवडी, माजी महापौर हारुण शिकलगार, माजी महापौर कांचन कांबळे यांच्यासह कॉँग्रेसचे सर्व २१ सदस्य उपस्थित होते. सांगली लोकसभा मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय पक्षाने अद्याप जाहीर केला नाही. तरीही घटक पक्षाला जागा सोडली तर काय भूमिका घ्यायची, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्यास कॉँग्रेसच्या उमेदवाराने तिकडे जाऊन पुरस्कृत व्हायचे का? असा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर कॉँग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी त्यास विरोध केला. उत्तम साखळकर म्हणाले की, कॉँग्रेसचे या मतदारसंघात वर्चस्व अजूनही आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती यामध्ये आजही भाजपच्या तोडीस तोड ताकद कॉँग्रेसची आहे. असे असताना ही जागा स्वाभिमानीला सोडण्याची गरज नाही. एका निवडणुकीत पराभव झाला म्हणून पक्षाने हा निर्णय घेऊ नये.
हारुण शिकलगार म्हणाले, कॉँग्रेसच्या नेत्यांनी पुरस्कृत उमेदवार होण्याच्या भानगडीत पडू नये. अपक्ष लढून आपली ताकद दाखवून द्यावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तिकीट दिल्यास त्यांच्यासाठी बूथही लावणार नाही. त्यांना आता मदत केल्यास यापुढे या जागेवर त्यांचाच हक्क सांगितला जाईल. त्यामुळे ही आपल्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. कॉँग्रेसने आताच या गोष्टी थांबविल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. यास संतोष पाटील, अय्याज नायकवडी यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला.
आज ठरणार अधिकृत भूमिकावसंतदादा गटाचे कॉँग्रेस नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी येथील कृष्णाकाठच्या वसंतदादा स्फूर्तिस्थळावर होणार आहे. या मेळाव्यात वसंतदादा घराणे तसेच दादाप्रेमी कार्यकर्ते सांगली लोकसभेबाबत भूमिका निश्चित करणार आहेत. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने या गटाने अस्तित्वाची लढाई सुरू केली आहे. नगरसेवकांच्या बैठकीत बंडखोरीचा दिला गेलेला इशारा या मेळाव्यातसुद्धा दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकसंधपणे परिस्थितीचा मुकाबला करू : पाटीलबैठकीत विशाल पाटील म्हणाले की, नगरसेवकांची भूमिका पक्षहितासाठीच आहे. आज मला डावलले गेले, तर भविष्यात जयश्रीताई पाटील, विश्वजित कदम यांनाही असाच अनुभव येऊ शकतो. त्यामुळे गटा-तटाचा विचार न करता सर्वांनी एकसंधपणे या गोष्टीचा मुकाबला करायला हवा. एबी फॉर्म देण्याची मुदत चार एप्रिलपर्यंत आहे. तोपर्यंत आपण हा फॉर्म मिळविण्याचा ताकदीने प्रयत्न करू.