इस्लामपूर : वाळवा पंचायत समिती सभागृहाच्या नामकरणावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस सदस्यांनी आज थेट मुख्य इमारतीत घुसून जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत तिसऱ्या मजल्यावरील सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ वसंतदादा पाटील सभागृह अशा नामकरणाचा फलक झळकावला. सत्तारूढ राष्ट्रवादीचे सदस्य सभागृहात होते, मात्र त्यांच्याकडून बाहेर येऊन कसलाही विरोध न झाल्याने हा प्रसंग शांततेत पार पडला.वाळवा पंचायत समितीची नव्या इमारतीमधील लोकनेते राजारामबापू पाटील सभागृहात मासिक बैठक होती. त्या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धाव घेतली. तेथे महाडिक यांनी त्यांना निवेदन देऊन त्यासोबत कोणत्याही वास्तूचे नामकरण करण्यासाठी अमलात असलेल्या शासकीय अध्यादेशाची प्रतही सादर केली.गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी या नव्या इमारतीचा ताबा अद्याप पंचायत समितीकडे हस्तांतरित झालेला नाही. नामकरणाचा निर्णय सभागृहाने घेतला आहे. त्यावर कारवाई करण्यास आम्ही हतबल आहोत, असे महाडिक यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.सम्राट महाडिक म्हणाले, सभागृहाला जे नाव दिले आहे, त्याला आमचा विरोध नाही. मात्र वसंतदादा पाटील यांचे नाव शासन निर्णयानुसार असताना ते का डावलले. सभापती रवींद्र बर्डे यांनी पंचायत समितीला खासगी मालमत्ता बनवली आहे का? त्यांचा मनमानीपणा चालू देणार नाही. मुळात जी इमारत अद्याप पंचायत समितीच्या ताब्यात नाही, त्या इमारतीमधील सभागृहाच्या नामकरणाची एवढी घाई कशासाठी केली? तालुक्यातील, जिल्ह्यातील जनतेच्या भावनेचा अनादर सहन करणार नाही. या नामकरणासाठी शासनाची तसेच जि. प. प्रशासनाची परवानगी घेतली आहे का? हे बर्डे यांनी स्पष्ट करावे.पं. स. सदस्य प्रकाश पाटील म्हणाले, येथील सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांचाही अवमान करून लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले आहेत. मुळात शासनाची किंवा जिल्हा परिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे नामकरण केले आहे. तसेच महापुरुष आणि राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे लावण्याबाबतही शासन निर्णय आहे. त्याचाही अवमान सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यानंतर आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील सभागृहाला वसंतदादा पाटील सभागृह असा फलक झळकावला. यावेळी पं. स. सदस्य प्राजक्ता देशमुख, राजश्री माळी, अजित भांबुरे, नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, सोमनाथ फल्ले, लव्हाजी देशमुख, चेतन शिंदे, जलाल मुल्ला, सतीश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)वातावरण तापले : कॉंग्रेस सदस्यांकडून इशाराकाँग्रेस सदस्य प्रकाश पाटील (पेठ) यांनी सभागृहाच्या नामकरणाचा विषय पुन्हा उपस्थित केल्यावर वातावरण तापले. नामकरणासाठी शासनाची परवानगी घेतली का? तसेच महापुरुष आणि राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे लावताना शासन निर्णयाचा भंग झाला आहे. नामांतर कशावरून केले, याचे उत्तर द्या, अशी मागणी करीत आम्ही तो फलक लावला आहे. त्याला हात लावू नका. त्यातून राजकीय तेढ निर्माण झाल्यास तुम्ही जबाबदार रहाल, असा निर्वाणीचा इशारा दिला.सत्तारुढ सदस्यांची शेरेबाजी आणि गोंधळआक्रमक झालेल्या सभापती बर्डे यांनी भाषा सौम्य ठेवून वक्तव्ये केली पाहिजेत, अशा कानपिचक्या देत जुलै १४ मध्येच नव्या इमारतीमधील सभागृहाच्या नामकरणाचा ठराव झाला आहे. हे नामांतर नव्हे, शासन निर्णयानुसार छायाचित्रे लावली जातील. त्यामुळे सभागृहाच्या नामकरणावर चर्चा होणार नाही, असे सांगत पडदा टाकला. यावेळी सत्तारूढ सदस्यांनी जोरदार शेरेबाजी केल्याने गोंधळ माजला होता.
वसंतदादा सभागृहाचा फलक झळकविला
By admin | Published: October 15, 2015 11:05 PM