सांगली : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे गाळप अखेर मंगळवारपासून सुरु झाले आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, कारखाना प्रशासनाने काट्यावर ऊस उत्पादकांना बिल देण्याची घोषणा केली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून कधीकाळी नावलौकिक मिळविलेला वसंतदादा साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गत गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाची देणी अद्यापही दिलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच ही जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्कही काढण्यात आला होता. परंतु, तीनवेळा जागा विक्रीची निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे कारखान्याने शेतकऱ्यांची शंभर टक्के देणी दिली नाहीत. यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या. साखर आयुक्तांनी कारखान्याचा गाळप परवानाही थांबविला होता. परंतु, कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि प्रशासनाने जिद्दीने कारखान्याचे गाळप आज, मंगळवार दि. २ पासून सुरु केले आहे. विशाल पाटील यांनी काट्यावर उसाचे बिल देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी कारखान्याकडे उसाची उपलब्धता चांगली दिसत आहे. (प्रतिनिधी)
‘वसंतदादा’चे गाळप अखेर सुरू
By admin | Published: December 02, 2014 10:27 PM