सांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील विभागीय शेती गट कार्यालय अज्ञातांनी काल, शनिवारी मध्यरात्री पेटवून दिले. यामध्ये कार्यालयातील टेबल, खुर्ची, कपाट व ऊसनोंदीचे रजिस्टर जळून खाक झाले. यात दहा हजारांचे नुकसान झाले आहे. आज, रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंतदादा कारखान्याचे गेल्या अनेक वर्षांपासून कसबे डिग्रजमध्ये शेती विभागीय कार्यालय आहे. ऊस गाळप हंगामात या कार्यालयाचे काम जोरात असते. परिसरातील ऊस वाहतुकीची नोंद येथे केली जाते. सध्या या कार्यालयात रशीद युसूफ नदाफ (रा. कसबे डिग्रज) हे काम करतात. शनिवारी रात्री साडेदहा वाजता कार्यालय बंद करून ते घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञातांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व टेबल, खुर्ची, कपाट, तसेच ऊस नोंदीचे रजिस्टर पेटवून दिले. रविवारी सकाळी नदाफ कार्यालय उघडण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. नदाफ यांची फिर्याद घेऊन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नदाफ यांनी फिर्यादीत कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही. यापूर्वीही हे कार्यालय पेटवून देण्यात आले होते. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कसबे डिग्रजमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
‘वसंतदादा’चे शेती कार्यालय पेटविले
By admin | Published: January 12, 2015 1:20 AM