भिलवडी : कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करून वसंतदादा पाटील यांनी राज्यावर उपकार केले. मात्र दादांच्या पश्चात त्यांच्या घराण्याचे खच्चीकरण करण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीने केले. अजूनही वेळ गेलेली नाही. दादांच्या स्वाभिमानी नातवांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी, भाजपात त्यांच्यासाठी पायघड्या घालू, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ औदुंबर (ता. पलूस) येथे गुरुवारी झाला, यावेळी ते बोलत होते.महसूलमंत्री पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. अजितराव घोरपडे, बजरंग पाटील या नेत्यांनी आपल्यातील तात्त्विक व केवळ विकासाच्या मुद्द्यावरून असलेले मतभेद दत्तगुरूंच्या साक्षीने औदुंबराच्या डोहात बुडविले असल्याचे जाहीर केले. खासदार पाटील यांना पाच लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प करीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पक्षामध्ये कोणतेच मतभेद नव्हते आणि नाहीत. एखाद्याच्या संसारात कुरबुरी सुरू असल्या की, शेजाऱ्यांना आनंद वाटतो व कधी काडीमोड होईल याची ते वाट बघतात. पण त्यांचा संसार सुरळीत चालतो व शेजाऱ्यांचा भ्रमनिरास होतो. तशी अवस्था विरोधकांची आहे. आमचे खासदार व आमदारांमध्ये विकास कामांवरून तात्त्विक मतभेद होते. चांगली कामे करताना मतभेद होणे, हे जिवंतपणाचे लक्षण आहे. हे पेल्यातील वादळ संपले आहे. सदाभाऊ खोत यांना भाजपने मंत्रीपद दिल्याने राजू शेट्टी यांच्या पोटात दुखू लागले. त्यांना आपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही, म्हणूनच बुलडाण्यातून रविकांत तुपकर यांना उमेदवारी दिली नाही.
साठ वर्षे जनतेला वेठीस धरणाºया काँग्रेसला धडा शिकवा, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, सर्वाधिक मते देणाºया विधानसभा मतदारसंघास बक्षीस देऊन गौरवावे. संजयकाका जिंकणार, पण कोण जादा मताधिक्य देणार, यासाठी आमची स्पर्धा सुरू आहे. आ. जगताप म्हणाले की, तीस वर्षांच्या राजकीय प्रवासात सर्व पक्ष फिरून झाले; पण उपेक्षित राहिलेल्या जतला भजपनेच न्याय दिला. मी माझ्या आमदार मित्रांप्रमाणे केवळ बोलणार नाही, तर प्रत्यक्ष संजयकाकांना मताधिक्य देऊन कृती करून दाखवणार.
आ. गाडगीळ म्हणाले की, मी काकांना मताधिक्य देणार; पण काकांनी माझ्या मतदार संघासाठी केंद्रातून जास्तीत जास्त निधी द्यावा.आ. नाईक यांनी सांगली व हातकणंगले या दोन्ही मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.औदुंबरच्या दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आ. अनिल बाबर, आ. सुरेश हळवणकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, नीता केळकर, नितीन शिंदे, दीपक शिंदे, मुन्ना कुरणे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, राजाराम गरुड, जि. प. सदस्य नितीन नवले, सुनीता मोरे, पलूस पंचायत समितीच्या सभापती सीमाताई मांगलेकर आदी उपस्थित होते.एकजुटीने काँग्रेसने नांगी टाकली : खाडेआ. सुरेश खाडे म्हणाले की, आमच्यातील वादाच्या बातम्या ऐकून काँग्रेसला गुदगुल्या होत होत्या; पण घरातील भांडण घरात मिटवून एकजुटीने बाहेर आल्यावर काँग्रेसने नांगी टाकली आहे. माझ्या विधानसभा मतदार संघातून मी दिलेले मताधिक्य पक्षाने मोजून घ्यावे.औदुंबर (ता. पलूस) येथे भाजपचा प्रचार प्रारंभ गुरुवारी झाला. यावेळी डावीकडून आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, अजितराव घोरपडे, पालकमंत्री सुभाषराव देशमुख, खा. संजयकाका पाटील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नीता केळकर आदी उपस्थित होते.