संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील, विश्वस्त अमित पाटील यांच्या प्रेरणेने विद्यालयात दोन वर्षांपासून इनोव्हेशन सेल चालू असून, त्याअंतर्गत संशोधन कार्याची घोडदौड वेगाने सुरू आहे. कृषिप्रधान असलेल्या आपल्या भारतातील लोकांची धान्य साठवणुकीची समस्या लक्षात घेऊन या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.
या यंत्रात कोणत्याही प्रकारचे धान्य कोणत्याही वातावरणात दीर्घकाळापर्यंत सुरक्षित साठवून ठेवता येते हे या यंत्राचे खास वैशिष्ट्य आहे. या यंत्रात अनेक स्टोअरेज कंटेनर्स आहेत. यापैकी एका कंटेनरमध्ये कार्बन डायऑक्साईड दाबलेला आहे. एका चेंबरमध्ये मिक्सिंग फॅन बसविलेला आहे. त्यामुळे तेल व बोरिक पावडर धान्यात सहज मिसळता येते. परिणामी, धान्याची गुणवत्ता दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवणे सहज शक्य होते. हे यंत्र वाजवी दरात सहज उपलब्ध असल्याने घरोघरी लोक याचा वापर करू शकतात.
प्रसाद कुंभार, विक्रांत सुडके, वैष्णवी गुरव, प्रज्ञा खोत या मेकॅनिकल व इन्स्टुमेंटेशन विभागातील तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हे यंत्र बनविले आहे. विद्यार्थ्यांचे हे यश गौरवास्पद असल्याची प्रतिक्रिया संशोधन व विकास सेलचे प्रमुख डाॅ. ढवळे तसेच इनोव्हेशन सेलचे प्रमुख प्रा. मुकुंद हारुगडे यांनी व्यक्त केली. या संशोधनासाठी अध्यक्ष विशाल पाटील, विश्वस्त अमित पाटील, प्राचार्य डाॅ. डी. व्ही. घेवडे, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. सी. जी. हारगे, इन्स्टुमेंटेशन विभागप्रमुख विकास कराडे, रजिस्ट्रार किरण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.