तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले (वय ४०) यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यासोबत वायफळे येथील कोतवाल प्रदीप प्रकाश माने (वय २८), बस्तवडे येथील खासगी इसम दत्तात्रय उर्फ राहुल संभाजी बाबर (वय २८) यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तलाठी पदावरून मंडल अधिकारी पदावर पदोन्नती झाल्यानंतर, वायफळे येथे मंडल अधिकारी म्हणून वैशाली वाले यांची पहिलीच नेमणूक होती. सहा महिन्यांपूर्वी त्या मंडल अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. वाले यांनी बस्तवडे येथील तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून नोंदणी करायची, यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले. हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी त्यांना रंगेहाथ पकडले.तक्रारदार यांचे वडील आणि चुलत्यांनी मिळून तक्रारदाराच्या चुलत आजीची बस्तवडे गावातील जमीन खरेदी केली होती. या शेतजमिनीच्या दस्ताची नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्या चुलत्यांनी अर्ज दिला होता. त्याची सुनावणी मंडल अधिकारी वाले यांच्याकडे सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईनंतर तासगाव तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सीमा माने यांच्यासह पथकाने केली.