मोहन मगदूम ल्ल लिंगनूरअतिरिक्त आवक आणि नोटाबंदीमुळे दीड महिन्यापासून बाजारभाव गडगडल्याने मिरज पूर्व भागातील आरग, लिंगनूर, बेळंकी येथील शेतकरी भाजीपाला शेती काढून टाकत आहेत. सध्या बाजारात वांगी पाच रुपये किलोने विकली जात असून, ढबू मिरची तर फुकटही कोणी घेत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मिरज पूर्व भागातील शेतकरी कमी कालावधित जादा पैसे मिळवून देणारी भाजीपाल्याची पिके घेत असतात. मात्र सध्या भाजीपाला शेती दराअभावी तोट्यात जाऊ लागली आहे. बाजारपेठेत भाजीपाल्याची अतिरिक्त आवक होत आहे. त्यातच नोटाबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून भाजीपाला उत्पादकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. सुटे पैसे नसल्याने तोटा सहन करावा लागत आहे. अतिरिक्त भाजीपाल्याची आवक झाल्याने भाजीपाल्याची विक्री कवडीमोल दराने करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही. आर्थिक अडचणीत भरअनेकांनी कर्ज काढून बागा जतन केल्या होत्या. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीने यापूर्वीही अनेकदा शेतकऱ्यांना रडविले आहे. यंदा निसर्गाने साथ दिली असली, तरी बाजारातील परिस्थितीने शेतकऱ्यांना घाईला आणले आहे. दराचा प्रश्न इतका भेडसावत आहे की, आलेल्या बागा उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हतबलतेपाठोपाठ आता आर्थिक अडचणींची भर शेतकऱ्यांच्या आयुष्यात पडली आहे. त्यामुळे चिंतेचे ढग त्यांच्या शेतीवर दाटले आहेत. फुकटात वांगी वाटण्याची वेळलिंगनूर येथील भाजीपाला उत्पादक मनोहर नाईक यांनी तीस गुंठ्यामध्ये वांग्याची लागण केली असून, त्यासाठी चाळीस ते पन्नास हजार खर्च आला आहे. मात्र समाधानकारक दरच नसल्याने त्यांनी बाजारपेठेत वांगी पाठविणे बंद केले आहे. शेत रस्त्यालगतच असल्याने त्यांनी लोकांना वांगी फुकट देऊ केली, तरीही कोणी वांगी घेत नसल्यामुळे त्यांनी टॅ्रक्टरने वांग्याची सर्व शेती नांगरून टाकली. तीच परिस्थिती ढबू मिरचीची झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून लावलेली पिके काढून टाकली आहेत.ढबू मिरची तर फुकटही कोणी घेत नाहीवांगी पाच रुपये किलोने विकली जात आहेतआरग, लिंगनूर, बेळंकी येथील शेतकऱ्यांनी वांगी, ढबू मिरचीच्या बागा काढून टाकल्या आहेत
दराअभावी भाजीपाला बागा काढून टाकल्या!
By admin | Published: January 06, 2017 12:14 AM