इस्लामपूर शहरात रस्त्याच्या कडेच्या भाजी बाजारामुुळे गर्दी झाली. दुसऱ्या छायाचित्रात बाजारपेठ बंद असूनही रस्त्यावरून न हटणारी गर्दी दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन केल्यामुळे आठवडी बाजार बंद झाले आहेत. कारवाईच्या भीतीने मुख्य बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावरची गर्दी मात्र हटलेली दिसत नव्हती. भाजी मंडईचा बाजार तर रस्त्याच्या कडेलाच भरलेला होता.
लॉकडाऊनच्या पहिल्या आदेशातच अधिकृत भाजी मंडई सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी शहराचा मुख्य आठवडी बाजार असतो. पालिका प्रशासनाने या भाजी बाजाराचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मंडईत शुकशुकाट होऊन हा बाजार रस्त्याच्या कडेला भरला होता. त्यामुळे रस्त्यावरील गर्दीचे चित्र कायम होते.
शासनाच्या पहिल्या आदेशात शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत असा मिनी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याला सर्व घटकांकडून चांगला प्रतिसाद देण्याची मानसिक तयारी झाली होती. मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी कोणतीही कल्पना न देता संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची गडबड प्रशासनाकडून सुरू झाली. त्यामुळे अगोदरच संभ्रमात असलेल्या व्यापारी आणि इतर घटकांनी शासनाचा निषेध नोंदवत या लॉकडाऊनला विरोध दर्शविला.
समाजातील सर्वच घटकांच्या विरोधाची दखल घेत प्रशासनाने कारवाईच्या पातळीवर न उतरता शांत राहण्यास प्राधान्य दिल्याने शहरामध्ये कुठेही वादावादीचे प्रसंग उद्भवले नाहीत. मुख्य बाजारपेठ सामसूम असली तरी शहराच्या अन्य भागात संमिश्र पद्धतीने छोटा-मोठा व्यापारउदीम सुरू असल्याचे चित्र होते.
कोट
मागील वर्षी परिस्थितीचे गांभीर्य पाहून आम्ही स्वत:हून व्यापार बंद ठेवला होता. आता पुुन्हा लॉकडाऊन हा उपाय योग्य ठरत नाही. सम-विषम तारखा आणि वेळा ठरवून देऊन व्यवसाय सुुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.
-राजू ओसवाल, अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना
कोट
कोरोना वाढू नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. तोंडावर गुढीपाडव्याचा सण आला आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊनचा उपाय वापरला गेला पाहिजे.
-दिनेश पोरवाल, अध्यक्ष, सराफ व्यावसायिक संघटना