लाॅकडाऊनमध्ये रस्त्यावर भाजीबाजारास प्रशासनाने प्रतिबंध केला असून विक्रेत्यांना रोखण्यासाठी लोणीबाजार रस्ता बंद करण्यात आला आहे. शहरात विविध भागांतील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र, मार्केट परिसर व शनिवार पेठेत प्रशासनाचे निर्बंध झुगारत भाजीविक्रेते रस्त्यावर येत आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना न जुमानता दरारोज सकाळी अकरापर्यंत रस्त्यावर विक्रेते व ग्राहक गर्दी करीत आहेत. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधाची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र, नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे रस्त्यावरील हातगाड्या, विक्रेत्यांबाबत कारवाईला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. शहरातील सर्व व्यावसाय, उद्योजक, दुकानदार शासनाचे निर्बंध पाळत असताना मार्केट परिसर, शनिवार पेठ परिसरात मात्र सकाळच्या वेळेत बाजार रस्त्यावर भरत आहे. या परिसरात हातगाड्या, भाजी व फळ विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून रस्त्यावर बाजारात गर्दी होत आहे. सकाळी अकरानंतर हातगाड्या पुन्हा गल्लीबोळात फिरत आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांनी कारवाईचा प्रयत्न केल्यास विक्रेते आक्रमक पावित्रा घेत असल्यानेही पोलिसांकडून कारवाईची आवश्यकता आहे.
मिरजेत निर्बंध झुगारत रस्त्यावर भाजीबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:23 AM