सांगली : शहरातील सर्व आठवडाबाजार सुरू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी जनसेवा भाजीपाला संघटनेने गेल्या दोन दिवसांपासून सांगली आणि कुपवाडच्या उपनगरांमध्ये भाजीपाला विक्री बंद केली आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी उपनगरांमध्ये भाजीपाल्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे. दरम्यान, संघटनेच्या वतीने शुक्रवार, २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे शंभोराज काटकर यांनी सांगितले.
प्रशासनाने शहरातील १९ आठवडाबाजार बंद ठेवले आहे. कोरोनाचे नियम पाळून आठवडाबाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी, गर्दी टाळण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याची तयारीही जनसेवा फळे भाजीपाला आणि खाद्यपेय विक्रेता संघटनेने दर्शवली आहे. मात्र, त्याबाबत प्रशासनाकडून निर्णय न झाल्याने दोन दिवसांपासून उपनगरातील भाजीपाला विक्री बंद केली आहे. या बंदला विक्रेत्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांनी पुढचे दोन तीन दिवस भाजीपाला सांगलीत आणून नुकसान करून घेऊ नये, असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षांमध्ये भाजीपाला विक्रेते पूर्णतः कोलमडून पडले आहेत. घरपोच भाजी विक्री आणि फिरून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यात पोलीस आणि महापालिका यांच्याकडून दिलेल्या अपमानित वागणुकीमुळे व्यापारी दुखावला आहे. अशा स्थितीतून सकारात्मक चर्चा करण्याची तयारी आहे. पण, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही काटकर यांनी सांगितले.