सांगली : महापालिका प्रशासनाने भाजी बाजार भरविण्यासाठी पर्यायी जागा विक्रेत्यांना दिलेल्या असताना विश्रामबाग चौकातील रस्त्यावर मात्र बाजार भरविला जात आहे. प्रभागातील नगरसेवकांनी वारंवार प्रशासनाला कळवूनही याकडे डोळेझाक करण्यात आली. आता कुणाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाला जाग येईल, असा उद्विग्न सवाल भाजपचे गटनेते विनायक सिंहसने यांनी केला.
महापालिकेने विश्रामबाग चौकातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना जवळच्याच खुल्या जागेत स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवस भाजी विक्रीही बंद केली होती. पुन्हा सकाळी ७ ते ११ यावेळेत भाजी विक्री सुरू झाल्यानंतर विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. स्टेट बँकेजवळील रोडवरच विक्रेते हातगाड्या, टेम्पो लावून भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. विक्रेत्यांनी रस्तेच अडवले आहेत. केवळ चार-पाच फूट जागेतून नागरिकांनी दुचाकी,चारचाकी वाहने घेऊन जावे लागते. त्याचा त्रास दोन्ही बाजूच्या दुकानदारांना होत आहे. प्रभागाचे नगरसेवक सभागृह नेते विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, सविता मदने यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली. नगरसेवकांनी प्रशासनाला गर्दीच्या छायाचित्रासह तक्रार केली पण प्रशासनाने नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
चौकट
विश्रामबाग चौकातील भाजी बाजाराबाबत आपणाकडे तक्रारी आल्या आहेत. आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांना त्याबाबत कळविले. अतिक्रमणाचे फोटोही पाठवले आहेत तरीही प्रशासन काहीही करत नाही. दुर्घटना घडल्यावर प्रशासन याकडे पाहणार का?
- विनायक सिंहासने, गटनेते, भाजप