सांगली : शाकाहार ही भारत देशाची संस्कृती असून, ‘शाकाहार’ ही भारताची देन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृती ही मांसाहारी पद्धतीची होती. मांसाहार केल्याने वर्तमान व भविष्यातील जीवनही खराब होते. आज बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हे घातक आहे. शाकाहार हाच आदर्श आहार आहे, असे प्रतिपादन मुनिश्री नियमसागरजी महाराज यांनी केले.
येथील नेमिनाथनगरमध्ये दिगंबर जैनाचार्य, संत शिरोमणी १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमप्रभावक शिष्य अभिष्ण ज्ञानोपयोगी मुनिश्री नियमसागरजी, प्रबोधसागरजी, वृषभसागरजी, अभिनंदनसागरजी व सुपार्श्वसागरजी यांचा यावर्षीचा संयम-स्वर्ण पावन वर्षायोग सानंद सुरू असून, स्वर्ण पावन वर्षायोग कमिटीतर्फे शनिवारी सांगलीतील विविध शाळांतील जवळजवळ २ हजार विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार अभियानांतर्गत ‘शाकाहार आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर मुनिश्री नियमसागरजी महाराज यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
नियमसागरजी महाराज म्हणाले, काहीजण मांसाहार करीत नाहीत, परंतु ते मिश्रआहार करीत असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे घटक असतात, हे त्यांना माहीत नसते. यामध्ये बेकरीचे पदार्थ केक, बर्गर, पिझ्झा यामध्ये चरबीयुक्त डालडा यासारखे मांसाहारी घटक असतात. त्यामुळे मिश्रआहार करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ९ वेळा नमस्कार केल्यानंतर अन्न ग्रहण करावे, असा उपदेशही त्यांनी दिला. यावेळी राजकुमार चौगुले, सुहास पाटील, उदय पाटील, प्रशांत पाटील, शीतल पाटील, शीतल वळवडे, सुरेश चौगुुले, प्रवीण वाडकर, राजेंद्र अंकलखोपे, सागर पाटील, भूषण मगदूम, संदीप पाटील, सचिन आळतेकर, किरण इंगळे, राहुल पाटील, वसंत पाटील, मोहन चौगुले, सुभाष देसाई, राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.दोन हजारावर विद्यार्थ्यांचा सहभागयाप्रसंगी सुपार्श्वसागरजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी, अहिंसेचे मूळ स्रोत शाकाहार हेच आहे, असे स्पष्ट करताना, जैन धर्म व अहिंसेचा जवळचा संबंध आहे, असे मत व्यक्त केले.बालसंस्कार अभियानाचे संयोजन श्रीमती कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन चौगुले यांनी केले. यावेळी श्रीमती राजमती गर्ल्स हायस्कूल, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सावरकर, क. भ. दामाणी हायस्कूल, अभिनव बालमंदिरमधील २ हजारावर विद्यार्थी उपस्थित होते.