सांगली : मांसाहाराने मानवाच्या जीवनात तामसी प्रवृत्ती वाढते. शिवाय कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांनाही निमंत्रण मिळते. मांसाहार हा माणसाच्या शरीरासाठी बनलेला नाही. याउलट शाकाहारात अनेक पोषक घटक असतात. तोच आरोग्याचा खरा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी रविवारी सांगलीत केले.येथील नेमिनाथनगरमध्ये आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी आणि सुपार्श्वसागरजी महाराज यांचा संयम स्वर्ण पावन वर्षायोग सुरू आहे. या महोत्सवानिमित्त रविवारी शाकाहार संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. गंगवाल बोलत होते. या संमेलनात डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर) व ‘बौध्द साहित्य व शाकाहार’ विषयावर डॉ. संघप्रकाश दुड्डे (सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी संयोजक माजी महापौर सुरेश पाटील यांनी शाकाहार संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली.गंगवाल म्हणाले की, जैन समाज शाकाहारासाठी आग्रही राहिला आहे. अन्य समाजात शाकाहाराचा प्रसार करण्याची गरज आहे. शाकाहाराची लाट निर्माण झाल्यास मांसाहाराची दुकाने, कत्तलखाने बंद होतील. ही प्रक्रिया मोठी आहे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. एका व्यक्तीस शाकाहारी बनविले तरी, आपणास ५०० जिवांना अभयदान दिल्याचे पुण्य लाभेल. अनेक असाध्य आजारांचे कारण मांसाहार असल्याचे आता शास्त्रीयदृष्ट्याही स्पष्ट झाले आहे. भगवान महावीरांनी अहिंसेचा संदेश दिला. पण नकारात्मक अहिंसा महत्त्वाची नाही. त्याप्रमाणे दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी पुरूषार्थ दाखविण्याची गरज आहे. त्यातूनच अहिंसेचा संदेश समाजापर्यंत पोहोचू शकेल.डॉ. संघप्रकाश दुड्डे म्हणाले की, अडीच हजार वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी प्राणी हिंसेला विरोध केला होता. काया, वाचा व मन या तीनद्वारे माणूस हिंसा करीत असतो. भगवान बुद्धांनी शाकाहाराचा आग्रह धरला आहे. बौद्ध भिक्षूंनाही शाकाहाराबाबत २०८ नियम घालून दिले आहेत. वैराने वैर शमत नाही, तर ते अवैराने शमते, असे बुद्धांचे तत्त्वज्ञान होते. भगवान महावीर व भगवान बुद्ध यांच्या ‘जगा व जगू द्या’ या संदेशांची आज समाजाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दुड्डे यांनी पाली भाषेतील अनेक उदाहरणे देत बौद्ध साहित्यातील शाकाहारावर प्रकाशझोत टाकला.डॉ. रावसाहेब पाटील म्हणाले की, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्धांच्या आधी भगवान नेमीनाथ तीर्थंकरांनी प्राणीहत्येविरोधात विद्रोह केला होता. शाकाहार हा केवळ कुठला पदार्थ नाही, तर तो जीवनशैलीचा भाग आहे. माणसाचे शरीर हे मांसाहारासाठी बनलेले नसून ते शाकाहारासाठीच आहे. पारंपरिक आहारामुळे जीवन सुदृढ बनते. अमेरिकेत चार माणसांमागे एक माणून मानसिक रोगी आहे. त्यामागे मांसाहार हेच कारण आहे.मिश्रआहार बंद करा : नियमसागर महाराजनियमसागर महाराज म्हणाले की, आपण शाकाहार करीत असलो तरी, संपूर्ण शाकाहारी बनलेलो नाही. भगवान महावीरांनी, सूर्यास्तानंतर भोजन केल्यास ते शाकाहारी असले तरी मांसाहारच मानले आहे. आपण पिण्याचे पाणी शोषून घेत नाही. त्यातून अनेक जिवाणू आपल्या शरीरात जातात. तन, मन, वाणीवर मांसाहाराचा विकृत परिणाम होत असतो. बेकरी उत्पादने हा शाकाहार व मांसाहाराचा मिश्र आहार आहे. पण आपण बेकरीतील उत्पादने खात असतो. त्यामुळे हा मिश्रआहार बंद केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
शाकाहारच आरोग्याचा खरा मूलमंत्र: कल्याण गंगवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:50 PM