सांगली : शहरात लॉकडाऊन सुरू असतानाही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावरील गर्दीही वाढत आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी विश्रामबाग पाेलिसांनी कडक नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली. सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्तीवर होते. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सायंकाळी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती.
----
गस्तीवरील पोलिसांसाठी अल्पोपाहार
सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना सामाजिक बांधीलकीतून अल्पोपहार देण्यात आला. शहरातील कर्मवीर चौक, विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक, लक्ष्मी मंदिर चौकातील बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना अल्पोपाहार व पाण्याचे वाटप करण्यात आले.
----
कुपवाड फाटा लक्ष्मी मंदिर रोडवर रस्त्यावरच केबल
सांगली : कुपवाड फाटा ते लक्ष्मी मंदिर रोडवर सुरू असलेल्या एका बांधकामावर केबल रस्त्यावरच पडली आहे. या केबलवरून घसरून अपघाताची शक्यता आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुपवाडकडे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीत ही केबल अडकली. मात्र, दुचाकीचा वेग कमी असल्याने त्यांनी सावरत केबल काढून रस्त्याकडेला टाकली. तरी संबंधित कंपनीने केबल रस्त्यावरून बाजूला करावी, अशी मागणी होत आहे.
----
जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा वाहने रस्त्यावर
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयानजीक असलेल्या मध्यवर्ती शासकीय इमारतीसमोर पुन्हा एकदा वाहने लावली जात आहेत. या वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सध्या कोणीही नसल्याने पुन्हा रस्त्यावर वाहने लावली जात आहेत. पाठीमागे असलेल्या वाहनतळावरच पार्किंग व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी होत आहे.