लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबराेबरच त्यांना दंड आकारला जातो. एरव्ही पावतीपुस्तक घेऊन असणाऱ्या पोलिसांची यातून सुटका करत ‘ई-चलना’व्दारे दंड करण्याची सोय केली असलीतरी, तो दंड भरण्याकडे वाहनधारकांनी पाठ फिरवली आहे. गेल्या तीन वर्षात पोलिसांनी ९ कोटी ४४ लाख ९९ हजार ५०० रूपयांचा दंड केला यातील तब्बल सात कोटी ४३ लाख ७०० रूपयांचा अद्यापही भरण्यात आलेला नाही. त्यामुळे दंड झालेल्या केवळ २७ टक्के वाहनधारकांनी दंड भरला आहे.
भरधाव वाहने चालविण्यासह इतर वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसुलीसाठी अगोदर पोलिसांना अडचणी येत होत्या. पावती न करणे, लगेच कोणालातरी फोन करून दबाव आणण्याचे प्रकारही होत असत. यावर प्रभावी उपाय म्हणून आता ‘ई-चलनव्दारे दंड करण्यात येतो. यात फक्त वाहनधारकाचा वाहनाचा क्रमांक नोंदवला की त्याच्या घरी दंडाची पावती पोहोच होते.
दंड झालेल्या वाहनधारकांना मात्र, या दंडाबाबत गांभीर्य दिसून येत नाही. या दंडाची रक्कम थेट आरसी बुकवरही नोंदविण्यात येत असल्याने दंडाची रक्कम भरणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दंड झालेल्या वाहनधारकांनी दंड भरावा यासाठी आता प्रशासनाने आवाहन करत वसुली मोहीम सुरू केली आहे.
कोट
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहतूक शाखा व पोलिसांकडून दंड केला जातो. मात्र, हा दंड प्रशासनाकडे भरला जात नाही. पुढील कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी ई चलनाव्दारे झालेला दंड भरून प्रशासनास सहकार्य करावे.
दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक
चौकट
जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाणी, वाहतूक शाखेच्या माध्यमातून ९५ यंत्रांव्दारे ई चलन केले जाते. २०१९ पासून आतापर्यंत दंड करूनही त्याचा भरणा मात्र, झालेला नाही. त्यामुळे ७२.९१ टक्के वाहनधारकांनी दंड भरलाच नाही.
चौकट
वर्ष केसेसची संख्या दंडाची रक्कम
२०१९ ११२३०२ ३ कोटी २६ लाख ४ हजार २००
२०२० १९४४१९७ ५ कोटी ८२ लाख ३ हजार
२०२१ ३५९५६ १ कोटी ४१ लाख १२ हजार ३००
एकूण ३४२४५५ ९ कोटी ४४ लाख ९९ हजार ५००