सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर असलेली वाहनधारकांची वर्दळ व त्यात रस्त्यावरच चिखल झाल्याने वाहनधारकांची अडचण झाली. आकाशवाणी ते फळ मार्केटपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चिखल आल्याने वाहने घसरत होती. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार कायम असल्याने अडचणीत आणखी भर पडली.
---------
सांगलीत मटका घेणाऱ्यावर कारवाई
सांगली : शहरातील गणेश मार्केट परिसरात मटका घेणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक केली. इमान जमादार असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ४५० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस कर्मचारी अक्षय कांबळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
-----
माधवनगरमध्ये दुकानावर कारवाई
सांगली : कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंध कालावधीत परवानगी नसतानाही भांड्यांची दुकाने सुरू ठेवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. संजयनगर पोलीस ठाण्याचे सहा. निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई करत दुकानदारांना नोटीस बजावली.
---
पावसामुळे सांडपाणी रस्त्यावर
सांगली : शहरातील लक्ष्मी मंदिर चाैक ते चिन्मय पार्क रोडवर पाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीची मागणी असून, महापालिकेने पाण्याची निचरा होण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
----
निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी
सांगली : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी हाेत असल्याने प्रशासनाने लागू केलेले नियम शिथिल करण्याची मागणी होत आहे. अत्यावश्यक सेवावगळता सुरू असलेली इतर सर्व दुकाने व सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.