सांगली : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी पोलिसांकडून केवळ केसेस करण्यात येत होत्या मात्र, आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यासह त्याचे वाहन जप्त करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनची अंमलबजावणी करत असताना अनेकजण नियमांचे पालन करत नाहीत. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यास परवानगी नसतानाही अनेकजण बाहेर फिरत आहेत. सध्या असे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कलम १८८ नुसार पालीस कायदेशीर कारवाई करून न्यायालयात केस दाखल करत आहेत. मात्र, नियम भंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी जादा मनुष्यबळ खर्ची पडत असल्याने इतर कारवाईसाठी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून अधिक परिणामकारक कारवाई व्हावी यासाठी आता ५०० रूपये दंड करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात येणार आहे. याशिवाय त्या व्यक्तीचे वाहन लॉकडाऊन असेपर्यंत अथवा साथरोग आपत्ती अधिसूचना असेपर्यंत ते पोलिसांकडेच ताब्यात राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी शनिवारी जारी केले आहेत.