जुना बुधगाव रस्त्यावर पथदिवे लावण्याची मागणी
सांगली : सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी या रस्त्यावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर
सांगली : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यांवर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्लास्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
सांगली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
सांगलीतील शेरीनाल्यात अतिक्रमण कायमच
सांगली : येथील शेरीनाल्यात अनेक व्यक्तींनी अतिक्रमण करून त्यामध्ये बांधकामे केली आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. हे अतिक्रमण हटविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणधारकांनी पक्की घरेही बांधली आहेत.
आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या
सांगली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
भरधाव वाहनांवर कारवाई करा
सांगली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाकडून होणारी कारवाई थांबल्याचे दिसत आहे.
प्रवासी निवाऱ्याला झुडपांचा वेढा
सांगली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रवासी निवारा शेड बांधण्यात आली आहेत. मात्र या निवाऱ्यांच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. अनेक ठिकाणी पत्रे उडून गेले आहेत. प्रवासी निवाऱ्यात बसूच शकत नाही. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाच्यावतीने प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती केली जात नाही.
रिक्त पदांमुळे होतोय कामांवर परिणाम
सांगली : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे लसीकरणावर त्याचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेळ्या, मेंढ्या आणि गाई, म्हैशींचे लसीकरण झाले नाही. याबाबत पशुपालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.