संजयनगर : विवेकाचे आणि संत विचारांचे खूप जवळचे नाते आहे, असे प्रतिपादन ॲड. देवदत्त परुळेकर यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आषाढी वारीनिमित्त ‘विवेकाची वारी’ या तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेची सुरुवात शुक्रवारपासून झाली. यात पहिल्या दिवशी ‘संत विचार आणि धर्म चिकित्सा’ या विषयावर ॲड. देवदत्त परुळेकर यांनी व्याख्यान दिले.
ते म्हणाले, संत आणि विवेक हे वेगळे होऊ शकत नाहीत. राजकीय क्रांती व्हायची असेल, तर त्यासाठी सामाजिक आणि धार्मिक क्रांती व्हावी लागेल, असे आंबेडकर म्हणत. त्यासाठी बाबासाहेब हे गौतम बुद्ध, गुरुनानक आणि महाराष्ट्रातील संतांच्या योगदानाचा जयजयकार करतात. हेच प्रतिपादन महादेव गोविंद रानडे हे त्यांच्या ‘राईज् ऑफ मराठा पॉवर’ या पुस्तकात केले आहे. आपल्या महाराष्ट्राला समाज सुधारकांचा माेठा वारसा आहे, त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, गांधी यांनी धर्माला मानलेले आहे आणि धर्माची चिकित्सासुद्धा केली आहे.
ॲड. परुळेकर म्हणाले, मुळात संत कुणाला म्हणायचे, यातूनच आपली धर्माची चिकित्सा सुरू होऊ शकते. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत मुक्ताबाई यांनी संतांची व्याख्या वेगवेगळ्या शब्दांत केली आहे. प्रत्येक धर्मात काही शाश्वत मूल्ये, काही कर्मकांड, मिथके आणि शोषण असते. संतांनी या धर्माची चिकित्सा या चार पातळीवर केलेली आहे. आपल्या तत्त्वज्ञानात असलेली धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चौकट संतांनी नाकारली आहे. भक्तीमध्येच मुक्ती सांगितली आहे. वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांनी मोक्ष, मुक्ती, आणि स्वर्ग-नरक ही संकल्पना नाकारली आहे. पाप-पुण्य संकल्पनेला परोपकार आणि परपीडा याच्या नजरेतून नवीन आकलन दिले. देवाची पूजा करण्यासाठी यम-नियम, उपास-तापास करण्याची गरज नाही हे सांगितले आहे.
सुनीता देवलवार यांनी परिचय करून दिला. सुनील स्वामी यांनी प्रास्ताविक केले. धनंजय कोठावळे यांनी सूत्रसंचालन केले.