सांगली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने दि. १० जुलैला वयाच्या शंभरीत पदार्पण करत आहेत. याबद्दल येथील सर्व पुरोगामी संघटना, पक्षांतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून लोकचळवळीच्या नेत्या मेघा पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. निरंजन टकले उपस्थित राहणार आहेत.माधवराव माने यांच्या सत्काराच्या तयारीबाबत पुरोगामी चळवळीतील संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सदाशिव मगदुम, शहाजी जाधव, हसन देसाई, विकास मगदुम, ॲड. सुभाष पाटील, शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे आदीसह मान्यवर उपस्थित होते. आमदार अरुण लाड, माजी आ. प्रा. शरद पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. प्रा. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, महापौर दिग्विजय सूर्यवंशी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.पृथ्वीराज पाटील व विकास मगदुम म्हणाले, येळावी (ता. तासगाव) येथे १० जुलै, १९२४ रोजी माधवराव भुजंगराव माने यांचा जन्म झाला. तासगाव हायस्कूल येथे शिक्षण घेत असतानाच ते क्रांतिसिंह नाना पाटील यांना गुरू मानून शालेय शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९४२चा ब्रिटिशविरोधी ‘चले जाव’चा लढा सुरू झाला आणि ३ ऑगस्ट, १९४२ रोजी तासगावच्या मामलेदार कचेरीवर १० हजारांचा मोर्चा काढून ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा ध्वज फडकावण्यात ते यशस्वी झाले. नऊ क्रांतिकारकांना ठार मारणाऱ्या फौजदाराच्या घरावर बॉम्ब टाकण्यात सहभाग घेतला. याच कारणास्तव नऊ महिने कारावास भोगला. माने यांचा सोमवार, दि. १० जुलैरोजी दुपारी दोन वाजता शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सत्कार करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांचा १० जुलैला सत्कार, शंभराव्या वाढदिवसानिमित्त गौरव
By अशोक डोंबाळे | Published: June 30, 2023 6:50 PM