लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची १५ पैकी १३ पदांसह विविध पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये स्मारक बनून राहिले आहेत. या शासकीय सुविधेवर शासनाचे लाखो रुपये खर्च पडत आहेत. त्यामुळे या सेवेची ‘असून घोटाळा, नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासकीय यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
शिराळा तालुका डोंगरी व ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. शासनाकडून पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध असूनही ही सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत; यामुळे तुटपुंजी सेवा मिळत आहे. त्याचबरोबर विविध रोगांबाबत लसीकरणाची कामे ठप्प आहेत.
तालुक्यात गाय २४ हजार २५४, म्हैस ४८ हजार ८३८, शेळ्या-मेंढ्या ८ हजार ९०२, कोंबड्या ८७ हजार ८३९, डुकरे २००, कुत्री ३१९८ असे एकूण १ लाख ७१ हजार २३१ पशुधन आहे. त्याचबरोबर १९ पशुवैद्यकीय रुग्णालये व एक फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय आहे.
चौकट
रिक्त पदे अशी
पशुसंवर्धन विभागाकडील अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यरत पदे व कंसात रिक्त पदे. पशुधन विकास अधिकारी श्रेणी १- १५ (रिक्त १३), सहायक पशुधन विकास अधिकारी ४ (रिक्त २), पशुधन पर्यवेक्षक ७ (रिक्त १), व्रणोपचारक १० (रिक्त ४), परिचर एकूण २७ (रिक्त १), एकूण पदे ६४ ( रिक्त २१) आहेत.