मिरज : मिरजेत खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून तंतुवाद्य व्यावसायिक संजय मिरजकर बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी आठ सावकारांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ५१ लाखाच्या कर्जापोटी मिरजकर यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपये व्याज वसूल केल्याचे निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे, तर अन्य सातजण फरारी आहेत. खासगी सावकारीप्रकरणी मिरजेतील संतोष कोळी, शंतनू कोळी, जितेंद्र ढोले, शैलेंद्र ढोले, सुरेश लांडगे, विजय पाटगावकर, सूरज दिवसे, सचिन गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापैकी विजय पाटगावकर यास अटक झाल्यानंतर अन्य संशयित फरारी झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बेळगाव वाहतूक सेनेचा माजी पदाधिकारी सुरेश लांडगे व भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष जितेंद्र ढाले यांचा समावेश आहे.शनिवार पेठेतील तंतुवाद्याचे व्यापारी संजय मधुकर मिरजकर यांनी जयसिंगपूर येथे हॉटेल खरेदीसाठी मिरजेतील काही खासगी सावकारांकडून १० ते ४० टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. दोन वर्षात या सावकारांना तब्बल दोन कोटी रूपये परत दिल्यानंतरही, आणखी व्याजाची मागणी करून सावकारांनी मिरजकर यांना मारहाण करून, त्यांची किडनी काढून घेण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून ते २९ डिसेंबर रोजी घरातून बेपत्ता झाले. याबाबत कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मिरजकर यांना शोधून काढले.याप्रकरणी मिरजकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आठ खासगी सावकारांविरुध्द चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संतोष महादेव कोळी व शंतनू महादेव कोळी (रा. माजी सैनिक वसाहत, मिरज) यांच्याकडून मिरजकर यांनी १५ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते.
वर्षभरात त्यांच्याकडून ४० टक्के व्याजदराने वसुली करण्यात आली. व्याज वसुलीसाठी कोळी यांचे साथीदार विजय पाटगावकर (रा. माजी सैनिक वसाहत, मिरज), सूरज शहाजी दिवसे (रा. विजयनगर, सांगली), सचिन गायकवाड (रा. एमआयडीसी, मिरज) यांनी मिरजकर त्यांना उचलून नेऊन डांबून ठेवून मारहाण केल्याची तक्रार आहे. मिरजकर यांनी १५ लाखाच्या परतफेडीसाठी कोळी व त्याच्या साथीदारांना ३ वर्षात १ कोटी ४ लाख दिले. मात्र कोळी बंधू आणखी ३५ लाखाची मागणी करीत होते.
कोळी याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी खासगी सावकार सुरेश दादासाहेब लांडगे (रा. सुंदरनगर, मिरज) याने मिरजकर यांना १० ते ४० टक्के व्याजदराने १० लाख रुपये दिले. कर्जाची रक्कम संतोष कोळी याने घेतली. त्यानंतर सुरेश लांडगे याने वसुलीसाठी मिरजकर यांच्या दुकानात जाऊन शिवीगाळ, दमदाटी केल्याने मिरजकर यांनी १० लाखाच्या बदल्यात २४ लाख परत केले. मात्र सावकार लांडगे याने आणखी १५ लाखाच्या वसुलीसाठी तगादा लावला होता.
मिरजकर यांनी जितेंद्र अण्णासाहेब ढोले व शैलेंद्र अण्णासाहेब ढोले (रा. भानू तालीमजवळ, मिरज) यांच्याकडून १९ लाखाच्या बदल्यात दीड वर्षात ४८ लाख रूपये दिल्यानंतरही ढोले बंधू आणखी २० लाखाच्या मागणीसाठी धमकावत होते. मिरजकर यांनी संतोष कोळी याचा साथीदार सूरज दिवसे याच्याकडून ७ लाख ५० हजार रूपये ४० टक्के व्याजदाराने घेतले होते.
दिवसे याने मिरजकर यांना मारहाण करून ही रक्कम संतोष कोळी व शंतनू कोळी बंधूंची असल्याचे सांगून दम भरला होता. मिरजकर यांच्याकडून ७ लाख ५० हजाराच्या बदल्यात दीड वर्षात २७ लाख रूपये वसूल केल्यानंतर दिवसे व त्याचे साथीदार आणखी ११ लाखाच्या वसुलीसाठी धमकावत होते. हॉटेल, घर व जमिनी विकून त्यांनी व्याज दिले, तरी कर्जफेड करणे अशक्य झाल्याने, संजय मिरजकर त्रास देणाऱ्या आठ सावकारांच्या नावांची चिठ्ठी लिहून घरातून बेपत्ता झाले होते.