लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) फाट्यावर रस्त्यावरील खड्ड्याने येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील अवधूत धनाजी पाटील (वय २२) या तरुणाचा बळी घेतला. खड्ड्यात दुचाकी आदळल्याने रस्त्यावर पडून पाठीमागून आलेल्या टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने तो जागीच ठार झाला. रविवारी दुपारी पावणेदोन वाजता हा अपघात झाला.अवधूत रविवारी सकाळी दुचाकीवरून सांगलीत कामानिमित्त आला होता. काम आटोपल्यानंतर तो गावाकडे निघाला होता. कसबे डिग्रज फाट्यावर गेल्यानंतर रस्त्यावर मध्यभागी खड्डा होता. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहिले होते. अवधूतला खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्याने या खड्ड्यात दुचाकी घातली. त्यामुळे तो दुचाकीसह रस्त्यावर उडून पडला. तेवढ्यात पाठीमागून टेम्पो (क्र. एमएच १०, झेड १३५०) भरधाव वेगाने येत होता. तो इस्लामपूरला निघाला होता. या टेम्पोखाली अवधूत सापडला. पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. टेम्पोचालकाने तेथून पलायन केले. त्याने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून अपघाताची माहिती दिली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कसबे डिग्रजचे रुग्णवाहिका चालक दीपक डिस्ले यांनी पोलिसांना पंचनाम्यावेळी मदत केली. अवधूत एकुलता अवधूतच्या पश्चात आई, वडील, आजी, विवाहित बहीण, चुलते असा परिवार आहे. तो एकुलता होता. त्याच्या अपघाताचे वृत्त समजताच कुटुंबास धक्का बसला. तो लष्करात भरती होणार होता. नुकतीच त्याची मैदानी चाचणी झाली होती. भरती प्रक्रियेच्या पुढील कामासाठीच तो सांगलीत आला होता, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.
खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी
By admin | Published: July 03, 2017 12:00 AM