कुपवाड : शहरातील बामणोली रस्त्यालगत प्रशांत महादेव नवाळे (वय ४८, रा. कापसे प्लाॅट, कुपवाड) या ऑनलाईन व्हिडीओ गेमपार्लर चालकाचा बुधवारी दुपारी आर्थिक वादातून चाकूने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी संशयित चाँद मीरासाहेब शेख (२९, रा. कापसे प्लाॅट, कुपवाड) याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून मृत प्रशांत नवाळे बामणोली रस्त्यालगत भाड्याने दुकानगाळा घेऊन ऑनलाईन व्हिडीओ गेमपार्लर चालवीत होते. नवाळे यांनी संशयित चांद शेख याला वर्षभरापूर्वी ८० हजार रुपये उसने दिले होते. या दिलेल्या पैशावरून नवाळे व शेख यांच्यात सतत वादावादी होत असे.
बुधवारी दुपारी नवाळे ऑनलाईन पार्लरमध्ये बसले होते. त्यावेळी अचानक शेख दुकानात आला. यावेळी नवाळे व शेख यांच्यात पुन्हा पैशावरून जोरदार वाद झाला. वादावादीत शेख याने चिडून नवाळे यांच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये एक वार वर्मी लागल्याने नवाळे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, नवाळे रक्तबंबाळ झालेले पाहून चांद शेख याने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर पार्लर शेजारील देशी दारूच्या दुकानासह रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील सर्व दुकाने पटापट बंद झाली. घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवाळे यांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत संशयित चांद शेख याला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.