कोकरुड : चांदोली राष्ट्रीय अभयारण्यातच सिंह नाहीत. सोशल मिडियावर अज्ञाताने आटूगडेवाडीतील झाडीत सिंहाच्या डरकाळीचा टाकलेला व्हिडिओ खोटा असल्याची वन विभागाकडून सांगण्यात आले.
आटूगडेवाडी (मेणी ता. शिराळा) येथील झाडीत ओरडत असल्याचा सिंहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडिओची चर्चा सुरू होती. लोकांकडून सिंहाबाबत विचारणा होत होती. आटूगडेवाडीच्या वरती वनविभागाची थोडी झाडी आहे. व्हिडिओमध्ये दाखवली झाडे तिथे नाहीत. चार महिन्यांपूर्वी चांदोली अभयारण्यात करण्यात आलेल्या प्राण्यांच्या गणतीत पट्टेवाले आणि बिबट्या, वाघ, गवे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर, सायाळ, भेकर, ससे, रानकुत्री, शेकरु, खवले मांजर, तृण, हरीण इत्यादी प्राणी आढळले होते. सिंह आढळला नसतानाही आटूगडेवाडीत सिंह आला कुठून याची चर्चा सुरू होती. त्यात सध्या सोशल मीडियात फिरत असलेला सिंहाचा व्हिडिओ खोटा असून, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.