प्रताप महाडीक
कडेगाव - माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी चिंचणी तालुका कडेगाव येथे एका गणेशोत्सव मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर चक्क ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी पलूस आणि कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले यावेळी हणमंतनगर चिंचणी येथील राजमुद्रा मंडळालाही भेट दिली.
मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुक नुकतीच सुरू झाली होती. यावेळी ढोल ताशांच्या दणदणाट, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, सजवलेल्या ट्रॅक्टर रथावर विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती, गुलालाची उधळण यामुळे वातावरण एकदम मंगलमय झाले होते.अशा जल्लोषपूर्ण वातावरणात संध्याकाळी राजमुद्रा मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरू झाली. या गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम यांचे आगमन झाले.
आमदार डॉ. कदम यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. दरम्यान काही वेळाने "भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, सक्सेसफुल ठरलोय आज सक्सेसफुल" हे गाणे वाजू लागले. तरुणाईने ठेका धरला यावेळी यावेळी कळत-नकळत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी तरुणाईसोबत ठेका धरला."सक्सेसफुल" चा जोश सर्वत्र पसरला आणि जल्लोष सुरू झाला. समोर प्रेक्षक आणि कार्यकर्त्यांनी शिट्ट्यांची बरसात सुरू केली. यावेळी राजमुद्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आणि तरुणाईचा आनंदही द्विगुणित झाला आणि तरुणाईने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला.