सांगली - कोल्हापूर आणि सांगलीतील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. मात्र, सांगलीकर असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटनेचे संभाजी भिडे कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला होता. या प्रश्नाला आता खुद्द सैन्यातील जवानांनी सॅल्यूट करुन उत्तर दिले आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना अतिशय मजबूत असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा सॅल्यूट आहे. सचिन मोहिते या बिचाऱ्याने तर आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत केली. आमच्या खायचं, राहायचं, नाश्त्याचं सर्वकाही बघत होता. आमचं काम तर त्यानी पाहिलंच, पण आम्हाला शेवटी जाण्यासाठीही त्यानं मदत केली. संघटनेच्या अनेक मित्रांनी या कामी आम्हाला मदत केली, सर्वांची नाव मला माहिती नाहीत. त्यामुळे, मी सर्वांचे आभार मानतो, अशा शब्दात सैन्य दलाच्या एका तुकडीने संभाजी भिंडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं आहे.
पाहा व्हिडीओ -
'संघटनेचे सर्वच कार्यकर्ते आमच्यासोबत होते. जेवढ आम्ही काम केलं, त्याच्या दुपटीनं तुमच्या कार्यकर्त्यांनी काम केलंय. तुमची आणि आमची अशीच एकता राहिली, तर आम्ही कुठेही फत्ते करू शकतो, असे म्हणत सैन्यातील या जवानाने हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना सॅल्यूट' केला आहे.
दरम्यान, सांगली आणि कोल्हापुरात महापूर आला असताना आदरणीय संभाजी भिडे गुरुजी कुठं आहेत? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता. आव्हाड यांच्या या ट्विटला अनेकांनी रिप्लाय देत, भिडे गुरूजी पहिल्या दिवसांपासून कामात मग्न असल्याचे सांगत होते. विशेष म्हणजे, 11 ऑगस्ट रोजी भिडे यांच्या एका कार्यक्रमाचे पत्रकही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरुनही, भिडे गुरुजी 32 मन सोन्याच्या सिंहासनासाठी मग्न असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र, या टिकेलाही अनेकांनी भिडे यांच्या पूरभागातील मदकार्याचे फोटो टाकून उत्तर दिले. त्यानंतर, आता स्वत: सैन्यातील जवानाने निरोप घेताना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना सॅल्यूट केला आहे. संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक आहेत.