आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १९ : कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दोनवेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिसऱ्यांदा समीर विष्णू गायकवाड याचा जामीन अर्ज मंजूर केला, तर सोमवारी कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सायंकाळी ५ वाजून १0 मिनिटांनी त्याची कळंबा कारागृहातून मुक्तता करण्यात आली. जामीन मिळताच त्याने खासगी वाहनातून सांगलीकडे प्रयाण केले. सुमारे २१ महिन्यांनंतर त्याची कारागृहातून मुक्तता करण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ असणारा साधक समीर गायकवाड याला शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. समीरला विशेष तपास पथकाने (एसआयटी)ने १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक केली होती. समीरने सलग तीन वेळा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता, त्यामध्ये उच्च न्यायालयाने एकदा आणि जिल्हा सत्र न्यायालयाने दोनवेळा त्याचा अर्ज विविध कारणास्तव फेटाळला होता. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणीत दोन्हीही बाजूंनी वकीलांचा युक्तीवाद झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायाधिश एल.डी. बिले यांनी त्याचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला होता. पण अपुऱ्या कागदपत्राअभावी त्याची कारागृहातून मुक्तता करता आली नाही. सोमवारी सकाळी समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन यांनी कृष्णात येडके व जगन्नाथ पाटील या दोघांच्या नावाने जामीनदारची कागदपत्रे जिल्हा व सत्र न्यायाधिश एल.डी. बिले यांच्याकडे सादर केली. त्यावेळी न्यायमूर्ती बिले यांनी दोघांही जामीनदारांना पुढे बोलवून त्यांची ओळखपरेड घेतली. तसेच समीरला जामीन देताना घालून दिलेल्या अटी व शर्थीबाबत दोघा जामीनदारांना सुचना दिल्या. समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी त्याच्या सुटकेसाठी न्यायाधिश बिले यांच्याकडे थेट आपल्याकडेच ‘रिलीज आॅर्डर’ देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायमूर्र्तींनी कायदेशीर कागदपत्रांवर सह्यांची पूर्तता करुन ‘रिलीज आॅर्डर’ अॅड. पटवर्धन यांच्याकडे दिली.
दोन जामीनदार
कृष्णात दत्तात्रय येडके (वासुंबे, ता. तासगाव, जि. सांगली) व जगन्नाथ धोंडीराम पाटील (निमणे नागांव, ता. तासगाव, जि. सांगली) या दोघांच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे जामीन समीर गायकवाडसाठी न्यायालयात अॅड. समीर पटवर्धन यांनी दिले.
समीरच्यावतीने न्यायालयात फक्त रेशनकार्ड सादर
समीर गायकवाड याच्या जामीनसाठी त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी समीरचे रेशनकार्ड तसेच दोन जामीनदारांचे रेशनकार्ड व प्रतिज्ञापत्र सादर केले. तर समीरचे रेशन कार्ड व आधार कार्ड हे विशेष तपास पथकाने (एसआयटी) यापूर्वीच तपासासाठी ताब्यात घेतल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
समीरने जामीनवेळी दिला सांगलीतील रहिवासी पत्ता
समीर गायकवाडला न्यायालयीन व पोलीस कामाव्यतिरिक्त बंद कोल्हापूर जिल्ह्यात बंदी घातली आहे. तो ज्या ठिकाणी रहीवासी असेल तेथील पत्ता न्यायालयात देणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्याने वकीलामार्फत दक्षिण शिवाजीनगर, शनी मारुती मंदीर, शंभरफूटी, सांगली हा रहीवासी पत्ता दिला आहे.
समीरला न्यायालयाने जामीन मंजूरसाठी घातलेले निर्बंध
प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कोल्हापुरातील कार्यालयात हजेरी द्यावी.तपास अधिकाऱ्यांकडे हजेरी आणि न्यायालयीन कामाव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यात त्यास प्रवेश करता येणार नाही. जामीन मिळाल्यानंतर तो राहणार असणारा पत्ता त्याने द्यावा, तसेच पासपोर्ट असल्यास न्यायालयाकडे जमा करावा.सरकारी पक्षाचा पुरावा नष्ट करण्याचा अगर साक्षीदारांवर दबाव आणण्याचा समीरने प्रयत्न करू नये.महाराष्ट्र सोडून कोठेही बाहेर जाऊ नये. त्याच्या वर्तनाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी.