सांगली : महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून सुरु असलेली लूट थांबविण्याची मागणी क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाहेरुन येणाऱ्या वाहनांची वाहतूक पोलिसांकडून चौका-चौकात कागदपत्रांच्या नावाखाली तपासणी केली जाते. यावेळी कागदपत्रे असतानाही वसुली केली जाते. वरिष्ठांनी यात लक्ष घालून ही लूट थांबवावी. वाहतूक पोलिसांच्या वर्तणुकीने जिल्ह्याची व जिल्हा पोलीस दलाची बदनामी होत आहे. परजिल्ह्यातून व परराज्यातून येणारे वाहनचालक पोलिसांच्या लुटीविषयीचे व्हिडीओ बनवून व्हायरल करतात. त्याचा त्रास जिल्ह्यातील वाहनचालकांनाही होतो. ते जेव्हा परजिल्ह्यात किंवा परराज्यात जातात, तेव्हा तेथील पोलीस त्रास देतात, सहकार्य करत नाहीत.
निवेदनात म्हटले आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी गांभीर्याने विचार करावा. वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या लुटीला पायबंद घालावा अन्यथा क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेतर्फे सर्व वाहनांसह धरणे आंदोलन केले जाईल. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत लोखंडे, इरफान बारगीर, अशोक माने, अरुण देवर्षी, मोजेस मोहिते, बसवराज कुंभार, सागर घाटगे आदींच्या सह्या आहेत.
चौकट
लूट थांबविण्यासाठी सीसीटीव्ही बसवा
क्रांतिकारी संघटनेने मागणी केली की, महापालिका क्षेत्रात जेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत, तेथेच पोलीस थांबतात व वाहनांकडून वसुली करतात. कागदपत्र तपासणीच्या नावाखाली पैसे काढले जातात. याला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सिग्नलही सुरु करावेत.
चौकट
अजित पाटलांच्या व्हिडीओने चौक रिकामा
मिरजेत महात्मा फुले चौकात सहा-सात वाहतूक पोलीस पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत थांबून वाहनचालकांकडून वसुली करत होेते. त्याबाबतचा व्हिडीओ कोल्हापुरातील अजित पाटील या चालकाने तयार करुन व्हायरल केला. वाहतूक पोलिसांची अब्रू त्यामुळे वेशीवर टांगली गेली. याची दखल घेत चौकातून वाहतूक पोलिसांची उचलबांगडी करण्यात आली. सध्या हा चौक रिकामा असून, पोलिसांच्या कोणत्याही त्रासाविना वाहतूक सुरु आहे. अजित पाटील यांच्या याच व्हिडीओची दखल घेत क्रांतिकारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.