शिराळा : नागाची हत्या करून ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ अशी घोषणा केलेली व्हिडिओ क्लिप व्हॉटस-अॅपवर प्रसिध्द झाल्याने या क्लिपमधील नाग मारणाºया व जयघोष करणाºया शहापूर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले. मारुती सर्जेराव कापसे (वय ३०) व रणजित सुभाष महापुरे (२३) अशी त्यांची नावे आहेत. शिराळा वनक्षेत्रपालांनी चोवीस तासात या घटनेचा तपास केला. व्हिडिओ क्लिप काढणाºयाचे नाव अद्याप निष्पन्न झालेले नाही.
बुधवारी व्हॉटस-अॅपवर २.४० मिनिटांची व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध झाली होती. नागाला पकडून त्याची हत्या केल्याचे चित्रीकरण त्यात होते. यावेळी संबंधितांनी ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ अशा घोषणा दिल्या होत्या. या व्यक्ती शिराळ्यातील नाहीत; मात्र नागाची हत्या करताना शिराळकरांच्या घोषणा देऊन भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. शिराळकरांच्या नावावर असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देऊन नागाची हत्या करणाºया व व्हिडिओ क्लिप प्रसिध्द करणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे विकास रोकडे, रामचंद्र जाधव, स्वार्थक माने, आशुतोष शिंदे, ओंकार गायकवाड, रोहित क्षीरसागर, युवराज मोहिते यांनी वनक्षेत्रपाल व पोलीस निरीक्षकांकडे केली होती.
या निवेदनावरून तसेच क्लिपच्याआधारे वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, वनपाल मिलिंद वाघमारे, वनरक्षक सचिन पाटील यांनी तपास केला. यामध्ये शहापूर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील नागाची हत्या करणाºया मारुती कापसे व अंबाबाईच्या नावाने चांगभलं अशी घोषणा देणाºया रणजित महापुरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी पन्हाळा वनक्षेत्राजवळील राजाराम श्रीपती निंबाळकर यांच्या शेतात नागाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. ही घटना पन्हाळा वनक्षेत्रपालांच्या कार्यक्षेत्रात घडली असल्याने हे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. व्हिडिओ क्लिप काढणाºयाचे नाव अद्याप निष्पन्न झालेले नाही. पन्हाळा वनक्षेत्रपालांनी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.