सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे निवडणूक विषयक कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.विधानसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने यंत्रणांनी निवडणूक विषयक कामकाज गतीमान करावे. परस्परांमध्ये समन्वय ठेवावा व काटेकोरपणे कामकाज हाताळावे, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे सांगली शहरासह अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रांची तपासणी करून दुरूस्तीबाबत तपशिलासह प्रस्ताव द्यावेत. मतदार जनजागृती मोहिमेबाबतचा तपशिलवार आराखडा तयार करावा असे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची संख्या विचारात घेवून सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव तयार करावेत. दिव्यांग मतदारांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यांचे मार्किंग करावे. एसएसटी, व्हीडिओ सर्व्हिलियंस टीम आदि अनुषंगिक टीम तयार कराव्यात. मतदान केंद्रात बदल असेल तर त्या संबंधित परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. चुनाव पाठशाला उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवावा, असेही निर्देश यावेळी दिले.