विटा : गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या नुकसानीस कंटाळून विटा शहरातील यंत्रमाग व्यवसाय मंगळवार, दि. २१ पासून आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय यंत्रमागधारकांनी बैठकीत घेतला असल्याची माहिती विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली. दि. ३ सप्टेंबरपर्यंत हा व्यवसाय पूर्णपणे बंद राहणार आहे.
अध्यक्ष तारळेकर म्हणाले, राज्यातील विकेंद्रीत यंत्रमागावर उत्पादित कापडाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत विक्रीकर मिळत नसल्याने व बाजारपेठेत कापूस, सूत आणि कापडाच्या दरात सातत्याने अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका यंत्रमागधारकांना बसत आहे. परिणामी, यंत्रमाग उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कापूस, सूत व कापड यांचा बाजारपेठेतील दरात उत्पादन खर्चाशी निगडीत कोणताही मेळ नसल्याने सूत व कापड उत्पादक आपला व्यवसाय सातत्याने नुकसानीत चालवित आहेत.
गेल्या महिन्यापासून नुकसान कमी करण्यासाठी यंत्रमाग व्यावसायिकांनी आठवड्यातील तीन दिवस यंत्रमाग उद्योग बंद ठेवून उत्पादन कमी करून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कामगारांचा विचार करून किमान चार दिवस तरी त्यांना रोजगार मिळावा, यासाठी नुकसान असूनही आठवड्यातील चार दिवस यंत्रमाग सुरू ठेवले होते. परंतु, ही परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट झाल्याने सोमवारी विटा शहरातील यंत्रमागधारकांनी तातडीची बैठक घेऊन नाईलाजास्तव संपूर्ण आठवडाभर शहरातील सर्व यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दि. ३ सप्टेंबरपर्यंत हा व्यवसाय बंद राहणार आहे. यापुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार, दि. २ सप्टेंबरला उद्योजकांची पुन्हा बैठक होणार असल्याचेही तारळेकर यांनी सांगितले.