फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे नोडल अधिकारी वर्षा पाटील यांनी कोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे कोरोना रुग्ण सापडत असून, दक्षता समितीमधील सदस्या उदासीन दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कसबे डिग्रज मंडलच्या नोडल अधिकारी तथा महिला बालकल्याण अधिकारी वर्षा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्यासह रुग्णाच्या घरी थेट भेट देऊन ग्रामविकास विकास अधिकारी, तलाठी यांच्यासह समितीची झाडाझडती घेतली.
कसबे डिग्रज येथे दोन कोरोना रुग्ण असताना तंटामुक्ती समिती व व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन दहा दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला; पण अद्यापही गावात लोक फिरत आहेत. मावा, गुटखा दारूची बेकायदेशीर विक्री केली जात आहे. याबाबत वर्षा पाटील यांनी आढावा घेतला व तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामविकास अधिकारी डी.आर. शिंदे, तलाठी के.एल. रूपनर यांना जबाबदारीने कामे करा, लोकांच्या जीविताशी खेळू नका, असे सांगितले.
सध्या कोरोना रुग्णांच्या घराला फलक नाहीत, कंटेन्मेंट झोन केले नाहीत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात नाही. विलगीकरणाबाबत नियोजन नाही, सामाजिक विलगीकरण कक्ष सुरू केले; पण लोक कमी वापरतात, अशी परिस्थिती आहे, ही जबाबदारी कोणाची, असा प्रश्न विचारला, तसेच दरम्यान कृषी सहायक गीतांजली चव्हाण हजर नसतात. त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
चौकट
सुरक्षा साधने कधी?
गावात सध्या ३८ कोरोना रुग्ण आहेत. ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, तलाठी दक्ष नाहीत. याबद्दल नोडल अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गावात कडक बंद असूनही दारू, मावा यांची चढ्या दराने विक्री सुरू आहे. आशासेविकांना कोणत्याही प्रकारची साधने न देता त्यांच्यावर जबाबदारी ढकलण्यात येत आहे.