बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील नागज गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर नागज गावातील प्रथमेश पोरे, निहार पोरे आणि विनायक पोरे हे तीन तरुण पहाटे मॉर्निंग वाॅकसाठी एका बाजूने नागज घाट उतरून गावाकडे परत येत होते.
या वेळी जालना जिल्ह्यातील जाफराबाद आगाराची मिरज आगाराकडे असलेली मालवाहतूक करणारी एसटी बस (क्रमांक एमएच २०डी ९६३८) जतकडून विट्याकडे निघाली होती. तरुणांपासून काही अंतरावर घाट चढणीवर ही बस असतानाच तिन्ही तरुणांनी हात उंचावत बसचालकाचे लक्ष वेधून घेत पाठीमागे काहीतरी घडत असल्याचे हातवारे केले.
बसचालकाने काय झाले असे विचारत बस थांबवली. त्या वेळी तरुणांनी बसचे मागील चाक तिरपे होत असल्याचे सांगितले. बसचालकाने चाकाची तपासणी केली असता, चाकाचे सर्व नटबोल्ट निघून पडल्याचे व एकाच नटबोल्टवर चाक फिरत असल्याचे पाहिल्यावर त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कारण आणखी काही अंतर पुढे गेल्यावर नागज घाटातील वेडीवाकडी वळणे सुरू होणार होती. नटबोल्ट नसल्याने सुमारे बारा टन मका घेऊन जाणारी ही एसटी बस चाके निघून पडल्याने दरीमध्ये कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
बसचालकाने तरुणांना धन्यवाद देऊन कवठेमहांकाळ आगारामध्ये कळविण्यासाठी संपर्क नंबर देण्याची विनंती केली. त्यानंतर बसचालकाने मिरज आगारात तर तरुणांनी कवठेमहांकाळ आगारात माहिती दिली.
कवठेमहांकाळ आगारातील कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ वाजता घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम सुरू केले.
दुपारी उशिरा ही मालवाहू बस रवाना झाली.
फोटो : १) कवठेमहांकाळ आगाराच्या कर्मचाऱ्यांकडून मालवाहू बसच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना.
२) प्रसंगावधान दाखवून एसटी बसची दुर्घटना टाळणारे नागजचे तरुण प्रथमेश, निहार व विनायक पोरे.