सांगली - कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा फिव्हर चांगलाच वाढला असून, उमेदवाराच्या प्रचारासाठी नवनवीन फंडे लढवले जात आहेत. तर सोशल मीडियाही ग्रामीण भागात जोरात प्रचार आणि प्रसाराचे माध्यम बनले आहे.कवठेमहांकाळ तालुका हा दुष्काळी व ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच उमेदवाराच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा सर्रास व मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. गावागावात प्रत्येक प्रभागात मोबाईलवर ग्रुप करून निवडणूक चिन्ह, घोषवाक्ये, नेत्याचे फोटो टाकून प्रचारात रंगत आणत मते खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेच कधी नव्हे ते गावागावात जिल्हा परिषद, विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे प्रचाराची विविध चालीवरची गाणी, शेरोशायरी ध्वनिक्षेपकावर वाजवून प्रचार गाड्या गावागावात, वाडी-वस्तीवर फिरवल्या जात आहेत. शिवाय फेसबुक, व्हॉटस्-अॅप आदीवर प्रचाराची धूळधाण उडाली आहे.
जाखापूरसारख्या ग्रामीण भागातही तरुणांचा निवडणुकीतील उत्साह शिगेला पोहोचला आहे. तरुणांमध्ये क्रेझ असणाºया नेत्यांच्या चाहत्या तरुणांनी डोक्यावर निवडणूक चिन्ह कोरून गावातील मतदारांचे लक्ष वेधले आहे. यामुळे उमेदवारांचा प्रचार, प्रसार जोरात होऊ लागला आहे.