विकास शहाशिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील एसटीचे सेवानिवृत्त वाहक आणि प्रयोगशील शेतकरी विजय सर्जेराव खोत यांनी डोंगरवाडीच्या शिवारात माळरानावर सफरचंदाची बाग लावली आहे. फुले आणि फळे फुलली आहेत. कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा काहीच वापर केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.खोत यांनी बारा गुंठे क्षेत्रावर हिमाचल प्रदेशातील सफरचंदाची लागण केली आहे. तिकडे लागण केल्यापासून तिसऱ्या वर्षी फळे येतात. मात्र, खोत यांनी लावलेल्या काही झाडांना पहिल्याच वर्षी फळे दिसू लागली आहेत. यू-ट्यूबवरून सफरचंदाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट हिमाचल प्रदेशातील विलासपूर येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.
त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांनी सफरचंदाची हार्बन, अण्णा, डोअर शेट, गोल्ड या चार जातींची १७५ सफरचंदाची रोपे २०० रुपयांप्रमाणे खरेदी केली. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी डोंगरवाडीजवळ शेतीत रोपांची लागण केली. प्रत्येक खड्ड्यात दोन ट्रॉली सेंद्रिय खत घातले. सध्या १२५ रोपे चांगली वाढली आहेत. खत, औषधांचा काहीच खर्च केला नाही.
वातावरण पोषक झाडांची छाटणी केल्यामुळे आता फुटव्यांना चांगली फुलकळी आली आहे. त्यातील काही झाडांना फळे लागली आहेत. पुढील वर्षापासून चांगली फळे मिळणार आहेत. झाडांना फळे लागली आहेत, याचा अर्थ येथील वातावरण सफरचंद रोपांना पोषक असल्याचे दिसत आहे. रोपांना फार कमी पाणी लागते, असे खोत म्हणाले.
छंद म्हणून शेतात वेगवेगळे प्रयोग करतो. सफरचंदाची लागवड आपल्या भागात यशस्वी होत आहे. द्राक्ष, डाळिंबासाठी औषधांचा मारा करावा लागतो. मात्र, माझ्या बागेत औषध, खताचा खर्च शून्य आहे. इतर पिकांसाठीही यापुढे सेंद्रिय खत वापरण्यावर भर देणार आहे. -विजय खोत, प्रयोगशील शेतकरी.