- घनशाम नवाथे सांगली - जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत) यांच्या खूनप्रकरणी गेले वर्षभर पोलिसांना चकवा देणारा फरारी उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) बुधवारी न्यायालयात शरण आला. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. खून प्रकरणात आता जत पोलिस न्यायालयातून त्याचा ताबा घेतील असे सांगण्यात आले.
अधिक माहिती अशी, १७ मार्च २०२३ रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मृत विजय ताड हे मोटार (एमएच १० सीएन ०००२) मधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्यांचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला. जत पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
ताड यांच्या खुनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७ रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाया दिनकर मदने (वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज), आकाश सुधाकर इनखंडे (वय २४ रा. के एम हायस्कुलजवळ सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय २७ रा. आर. आर. कॉलेजजवळ जत) या चौघांना अटक केली. पोलिस तपासात चौघांकडून गुन्हयात वापरलेली तीन पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, दोन जादा मॅग्झीन, सहा पुंगळ्या, दोन दुचाकी, दोन एअरगन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ताड यांचा खून मुख्य सुत्रधार उमेश सावंत याच्या चिथावणीवरुन तसेच नियोजन करुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खुनानंतर उमेश सावंत हा पसार झाला होता. त्याची माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगून २५ हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते. खुनातील संशयित पाच आरोपींना मोका देखील लावण्यात आला होता. उमेश सावंत हा पोलिसांना चकवा देत असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळला होता. तसेच त्याला फरार घोषित करण्यात आले होते.
बुधवारी उमेश सावंत हा जिल्हा न्यायालयात शरण आला. न्यायाधीशांनी त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली. आता जत पोलिस खून प्रकरणात न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा ताबा घेतली. त्यानंतर खुनाचा तपास करतील.
अनैतिक संबंधाच्या संशयातून खून विजय ताड याचा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आता उमेश सावंतच्या अटकेनंतर तपासात खरे कारण उघड होईल. त्यामुळे जत पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.