अशोक पाटील _ इस्लामपूरपुढील अडीच वर्षासाठी इस्लामपूर पालिकेतील नगराध्यक्षपद सुभाष सूर्यवंशी किंवा कविता कांबळे यांना मिळण्याची शक्यता आहे, तर उपनगराध्यक्षपद पीरअली पुणेकर यांना मिळेल. इच्छुक तीनही नगरसेवक विजयभाऊ गटाचे समर्थक असल्याने त्यांच्या गटाची सरशी होणार आहे. त्यामुळे एन. ए. व डांगे गु्रप थंडावल्याचे दिसत आहे.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया बुधवार दि. २३ रोजी होत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले सुभाष सूर्यवंशी हे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासह विजयभाऊ पाटील यांच्या संपर्कात आहेत. या दोघांनीही सूर्यवंशी यांना हिरवा कंदील दाखविल्याची चर्चा आहे. परंतु विजयभाऊ यांच्या प्रभागातील सौ. कविता कांबळे याही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने, पक्षप्रतोदांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. उपनगराध्यक्षपद विजयभाऊ गटालाच मिळावे म्हणून भाऊंच्या समर्थकांनी देव पाण्यात घातले आहेत. संजय कोरे यांची उपनगराध्यक्षपदी निवड होणार, अशी हवा असताना, नगरसेविका लता कुर्लेकर, नीलिमा कुशिरे, वैशाली हांडे, सीमा इदाते यांच्यावतीने मुकुंद कांबळे, अशोक इदाते, विजय कोळेकर, संभाजी कुशिरे यांनी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन, पीरअली पुणेकर यांना उपनगराध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केली आहे.सध्या सौ. अरुणादेवी पाटील या नगराध्यक्षा आहेत. त्या कोणत्याही गटाच्या नाहीत. परंतु उपनगराध्यक्षपदी असलेले शंकरराव चव्हाण हे विजयभाऊ यांचे समर्थक आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष दालन हे सर्वच गटांना खुले होते. आता नगराध्यक्षपदी सुभाष सूर्यवंशी आणि उपनगराध्यक्षपदी पीरअली पुणेकर यांची निवड झाल्यास, हे दालन विजयभाऊ गटाच्या ताब्यात जाणार आहे.गेल्या २५ वर्षात पालिकेतील राजकीय गाडा पक्षप्रतोद विजयभाऊ पाटीलच हाकत आहेत. निवडीवेळीही जयंत पाटील त्यांचाच विचार घेऊन निर्णय घेतील, असे स्पष्ट संकेत आहेत.
विजयभाऊ गटाचीच यंदाही सरशी होणार
By admin | Published: July 17, 2014 11:24 PM