अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे, तर शिराळ्यातून विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपची उमेदवारी मिळणारच हे गृहीत धरून तयारी केली आहे. मात्र विकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला या दोघांना डावलण्यात आले. त्यामुळे वाळवा-शिराळ्यातील उमेदवारीचा वाद चिघळणार आहे. विकास आघाडी भाजप आणि शिवसेनेच्या दावणीला बांधली गेल्याचेही स्पष्ट होत आहे.
इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या डिजिटल पोस्टरवर ‘अब की बार दादा आमदार’ अशा घोषणा होत्या. त्यामुळे विकास आघाडीतील नेत्यांत अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच समन्वय समितीच्या बैठकीत नगराध्यक्ष पाटील यांना डावलण्यात आले. शिराळ्यात आमदार नाईक यांना सम्राट महाडिक यांनी आव्हान दिल्याने, बैठकीत आमदार नाईक यांचीही अनुपस्थिती जाणवत होती.
नगराध्यक्ष पाटील यांच्या समर्थकांनी मतदार संघात लावलेल्या फलकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच स्थान देण्यात आले आहे. काही ठिकाणी सदाभाऊ खोत यांचे छायाचित्र दिसत आहे. नगराध्यक्ष पाटील यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारीचा शब्द दिल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी युध्दपातळीवर विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे.
विकास आघाडीतील नेते एकत्र येतील. समन्वयक समिती प्रमुख या नात्याने सर्वांची मोट बांधू. ही बैठक विकास आघाडीची नव्हती. इस्लामपूर मतदार संघातील उमेदवार ठरविण्यासाठी एक नवीन समिती गठित केली आहे. समितीमार्फत एकच उमेदवार ठरविण्यात येईल. मग तो भाजप अथवा शिवसेनेचाही असू शकतो.- भीमराव माने, समन्वय समिती प्रमुखउमेदवारीचा निर्णय अद्यापही झालेला नाही. राष्टÑवादीविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. हा मतदारसंघ कोणत्याही पक्षाला गेला तरी, समन्वय समितीची बैठक घेऊनच उमेदवारीचा प्रश्न सोडविला जाणार आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हेच घेणार आहेत.- विक्रम पाटील, अध्यक्ष, विकास आघाडी.