जत : आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीद्वारे लढविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोण कसे वागतो आणि काही भूमिका घेतो, यानंतर विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु जत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी आम्ही नेत्यांकडे करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी येथे दिली.
जत तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित लढवणार आहेत, हे निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय भूमिका घेतात, ते पाहून विधानसभा निवडणूक आघाडीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकत्रित आणि एक दिलाने काम करणार आहेत. त्यासंदर्भात जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत कार्यरत असणाऱ्या पदाधिकाºयांना आदेश देण्यात आले आहेत. पक्षाच्या बूथ कमिटीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
यावेळी प्रदेश संघटक ताजुद्दीन तांबोळी, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, पक्षनिरीक्षक राजू पाटील, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जत तालुकाध्यक्ष अॅड. बी. ए. धोडमणी, उत्तम चव्हाण, अॅड. चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, मीनाक्षी आक्की, सलीमा मुल्ला, शिवाजी शिंदे, विलास माने, मच्छिंद्र वाघमोडे, शंकरराव गायकवाड, फिरोज मुल्ला, जे. के. माळी, सिद्धू शिरसाट, किरण बिजरगी आदी उपस्थित होते.जलसंधारणाच्या कामाचा बोजवारा उडेल, म्हणूनच टँकर बंदजत तालुक्यात चारा व पाणीटंचाई आहे. जलसंधारणाच्या कामाचे जिल्'ाला बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे येथे टँकर सुरू करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. जलसंधारणाच्या कामाचा बोजवारा उडेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. साठवण तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून द्यावेत व येणारे वीज बिल आणि पाणीपट्टी टंचाई निधीतून भरावी, अशी मागणी विलासराव शिंदे यांनी केली.