अशोक पाटील ।इस्लामपूर : माजी आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शहर विकास आघाडीचे अध्यक्ष झुंजारराव शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. शहरातील राजकारण विलासराव शिंदे यांच्या विचारांचे राहील. यामध्ये कोणताही पक्ष येणार नाही. शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली पालिकेच्या माध्यमातून फक्त आष्ट्याचा विकास होईल. पक्षीय निर्णय घेण्याचा अधिकार झुंजारराव शिंदे यांनाच राहील, असे खात्रीशीर समजते.
आष्टा पालिकेत विलासराव शिंदे गटाचे नगराध्यक्ष यांच्यासह १२ नगरसेवक आहेत, तर आमदार जयंत पाटील गटाचे ९ नगरसेवक आहेत. हे सर्व नगरसेवक १९९६ पासून विलासराव शिंदे यांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली पालिकेवर सत्ता अबाधित ठेवून आहेत. आमदार जयंत पाटील यांचे मार्गदर्शन आणि विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास साधला आहे. आघाडीचे अध्यक्षपद झुंजारराव शिंदे यांनी समर्थपणे पेलले आहे.
गत जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी जि. प. मतदार संघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली गद्दारी विलासराव शिंदे यांच्या मनाला चटका लावणारी ठरली. पण ही सल त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बोलून दाखवली नाही. परिणामी त्यांचे पुत्र वैभव शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून शिंदे गटाचे कार्यकर्ते द्विधावस्थेत आहेत. त्यातच विलासराव शिंदे यांच्या निधनाने शहर विकास आघाडीत बिघाडी होईल, अशा अफवा विरोधकांनी उठवल्या. मात्र तसे झाले नाही.
विलासराव शिंदे यांचा विचार घेऊन शहर विकास आघाडीचे अध्यक्ष झुंजारराव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, नुकतेच भाजपमध्ये गेलेले वैभव शिंदे, विशाल शिंदे आणि आमदार जयंत पाटील गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या २ बैठका झाल्या. या बैठकीत आष्टा पालिकेत विलासराव शिंदे आणि आमदार जयंत पाटील यांचे दोन गट असले तरी, पालिकेची निवडणूक या दोन्ही गटांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवली आहे. वैभव शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने आष्टा शहरातील समीकरणे बदलतील, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात होते. यावर पर्याय म्हणून झुंजारराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शुक्रवारी प्रतिमेचे अनावरणविलासराव शिंदे यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांचा एक गट सध्याही कार्यरत आहे. या गटाची बैठक ४ आॅगस्ट रोजी आष्टा येथे बोलाविण्यात आली आहे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीत विलासराव शिंदे यांच्या प्रतिमेचे अनावरण २६ जुलै रोजी जयंत पाटील यांच्याहस्ते होणार आहे.आष्ट्यातील बलाबल...विलासराव शिंदे गट ३५ टक्केजयंत पाटील गट ३0 टक्केस्वा. शेतकरी संघटना १५ टक्केवैभव शिंदे (भाजप) १0 टक्केइतर पक्ष, संघटना १0 टक्के