सांगली : घरकुल बांधकाम करण्यासाठी मंजूर निधीतील हप्ता जमा करण्यासाठी १३ हजारांची लाच स्वीकारताना कवठेमहांकाळ पंचायत समितीचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अजित मुबारक मुल्ला सापडला होता, तसेच मणेराजुरी, ता. तासगाव येथील ग्रामविकास अधिकारी महादेव विठ्ठल जाधव यानेही घरकुलासाठी पैशाची मागणी केली हेाती. दोघांचाही पोलिसांचा अहवाल जिल्हा परिषदेला मिळाला असून त्यानुसार मुल्ला व जाधव या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विभागीय आयुक्तांकडून विभागीय चौकशी होणार आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातील तक्रारदाराकडे घरकुलाच्या बांधकामासाठी मंजूर निधीतील तिसरा व चौथा हप्ता जमा करण्यासाठी मुल्ला याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. मुल्ला याने तडजोडीअंती १३ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. ‘लाचलुचपत’ने सापळा रचून पैसे घेताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी मुल्लाला अटक केली होती. पोलिसांकडून आलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अजित मुबारक मुल्लाला निलंबित केले आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडून सखोल चौकशी करून पुढील कारवाई होणार आहे.मणेराजुरी, ता. तासगाव येथील ग्राविकास अधिकारी महादेव विठ्ठल जाधव याने तक्रारदाराकडे घरकुल योजनेच्या मंजूर निधीपैकी दुसऱ्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. पोलिसांच्या अहवालानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महादेव जाधव याला निलंबित केले आहे. याप्रकरणी जाधव यांची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई विभागीय आयुक्तांकडून करण्यात येणार आहे.
Sangli: लाचखोर स्थापत्य अभियंत्यासह मणेराजुरीचा ग्रामविकास अधिकारी निलंबित, जिल्हा परिषदेची कारवाई
By अशोक डोंबाळे | Published: June 30, 2023 5:31 PM