संख : प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस, हवेतील कमी आर्द्रता यामुळे जत तालुक्यात यंदा गावठी आंब्याला मोहोर कमी आला. त्यामुळे हंगाम कमी चालणार आहे. आवक कमी असल्याने २०० ते २५० रुपये प्रतिडझन भाव आहे.
दुष्काळी जत भागातील गावठी आंबा चवदार असतो. तो तुलनेने जास्त गोड असतो. या मधाळ आंब्याच्या कच्च्या कैऱ्याचे लोणचेही घातले जाते. वर्षभर टिकून राहाते. तालुक्यातील माडग्याळ, व्हसपेठ, उमदी, माडग्याळ, करजगी, बोर्गी, गुड्डापूर, बालगाव, हळ्ळी, बिळूर ,येळदरी, मुचंडी, बनाळी, तिकोंडी भागात आंब्याची झाडे आहेत. शेतीच्या बांधावर, पाणंदीत, बोर नदीच्या काठी झाडांची संख्या अधिक आहे. गावठी, शेपू, बदामी, गोटी, खोबरी या जातीचे हे आंबे आहेत. गावठी आंबा पालापाचोळ्यात नैसर्गिकरित्या पिकविला जातो.
मात्र प्रतिकूल हवामान, उन्हाच्या तडाख्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.
वातावरणात पुरेसी आर्द्रता असेल तर फळधारणा चांगली होते. परंतु यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे मोहोर गळून पडला आहे. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये झालेले वादळी वारे, अवकाळी पाऊस, उन्हाच्या तडाख्याने कैऱ्या गळून गेल्या आहेत. माळरानावरील झाडे पाण्याअभावी वाळून गेली आहेत. कुटुंबाची विभागणी, वेगळे झाल्यावर वाद नको म्हणून शेतातील व सीमेवर असलेल्या आंब्याच्या झाडांची विक्री करण्यात आली आहे.
सध्या संचारबंदीने आठवडा बाजार बंद आहेत. बसस्थानकावर, फिरते विक्रेते प्रतिडझन २०० ते २५० रुपये दराने विक्री करत आहेत.
शेतकऱ्यांनी सुधारित हापूस, केशर, पायरी, तोतापुरी या जातीच्या आंब्यांच्या बागा लावल्या आहेत. त्यालाही प्रतिकूल हवामानामुळे आंबा कमी आला आहे.
आंब्याविना अक्षय तृतीया साजरी
अक्षय तृतीयाला पहिला आंबा खरेदी केला जातो.
सध्या हापूस, पायरी आंबा ४०० ते ५०० रुपये डझन आहे. गावठी आंबाही महाग आहे. सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे यावर्षी अक्षय तृतीया आंब्याविना साजरी करावी लागली आहे.
कोट
गावठी आंब्याला चांगला मोहोर सुटला होता. अवकाळी पाऊस, उन्हाचा तडाखा, वादळी वाऱ्याने मोहोर गळून गेला आहे. चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा बाळगून होतो. परंतु यावर्षी खाण्यापुरतेच उत्पादन मिळणार आहे.
- लक्ष्मण कासाप्पा माळी,
माडग्याळ.
उत्पादक शेतकरी.