देवराष्ट्रे : मिरज पूणे मार्गावरील महत्त्वाचे आणि रेल्वेला मोठा महसूल मिळवून देणाऱ्या ताकारी स्टेशनवर कोयना, महाराष्ट्र, चालुक्य या लांब पल्ल्याच्या पूर्वी थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्या लॉकडाऊन पासून थांबविण्याचे बंद केले आहे. त्या पूर्वत थांबाव्यात, या मागणीसाठी येत्या २१ ऑगस्टला ताकारी येथे रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.एक्सप्रेस गाड्या बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या गाड्या पूर्वी प्रमाणेच ताकारीला थांबविण्यात याव्यात, यासाठी ताकारीच्या लोकनियुक्त सरपंच प्रणाली पाटील यांच्यासह ताकारी व परिसरातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण व त्यानंतर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासन व संबंधित विभागाला देण्यात आला आहे.ताकारी हे वाळवा,कराड, कडेगांव,विटा,पलूस व शिराळा या सहा तालुक्यातील मध्यवर्ती असणारे बाजार पेठेचे गाव आहे. येथे ताकारी सह दुधारी, तुपारी, दह्यारी, घोगाव, दुधोंडी, बनेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, मसूचीवाडी, बोरगाव, बहे, वाळवा, साखराळे, इस्लामपूर, जूनेखेड, नवेखेड, रेठरेहरणाक्ष, बिचुद, शिरटे, देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, अंबक चिंचणी, रामापूर, कमळापूर, वांगी, तडसर, कडेगांव आदी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.लॉकडाऊनपासून येथे थांबणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबविण्याचे बंद केले आहे. त्यामुळे महालक्ष्मी व दोन पॅसेंजर याच गाड्यांवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागत असल्याने ताकारी परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेलरोको करण्याचा इशारा ताकारीच्या सरपंच व परिसरातील नागरिकाच्या वतीने देण्यात आला आहे.
Sangli: ताकारी स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्या थांब्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, 'रेल रोको'चा दिला इशारा
By अविनाश कोळी | Published: August 10, 2023 4:16 PM